नेरळ-कळंब रस्ता पाण्याखाली जाण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 12:40 AM2020-06-10T00:40:15+5:302020-06-10T00:40:24+5:30

बिल्डरांची मनमानी : प्रशासनाचे दुर्लक्ष; पावसाला सुरुवात होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती

Neral-Kalamb road likely to be submerged | नेरळ-कळंब रस्ता पाण्याखाली जाण्याची शक्यता

नेरळ-कळंब रस्ता पाण्याखाली जाण्याची शक्यता

googlenewsNext

कांता हाबळे 

नेरळ : नेरळ धामोते या परिसरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प सुरू आहेत. हा परिसर प्राधिकरणात असल्यामुळे अनेक नामांकित गृह प्रकल्प येथे आकार घेत आहेत. मात्र, गृहप्रकल्प उभे करत असताना बिल्डर आपली मनमानी करत आहेत असे चित्र आहे. त्यामुळे येथील पूर्वापारपासूनचे नाले यांचे मार्ग पूर्णत: बंद होत आहेत. नेरळ विकास प्राधिकरणातील कोणी अधिकारी जागेवर येत नाही की ग्रामपंचायत त्यांना थांबवत नाही. त्यामुळे नेरळ-कळंब हा राज्यमार्ग दरवर्षी सातत्याने पाण्याखाली जात आहे. यंदा तर एका इमारत व्यावसायिकाने गृहप्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात भराव केल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नेरळ-कळंब या रस्त्याची काय अवस्था होणार या विचाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कर्जत तालुक्यातील मोठे शहर म्हणून नेरळ आकार घेत आहे. तेव्हा शासनाने विकासाच्या दृष्टिकोनातून साधारण २००२ साली येथे नेरळ विकास प्राधिकरणाची स्थापना केली. तेव्हा इमारत व्यावसायिकाला बांधकाम करताना प्राधिकरणाची मंजुरी घेऊन काम करावे लागते. त्यासाठी विकास करदेखील प्राधिकरणाला द्यावा लागतो. या प्राधिकरणात नेरळसह, ममदापूर, बोपेले, धामोते या गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नेरळ व्यतिरिक्त इतर भागांत मोठ्या प्रमाणात बांधकामे सध्या सुरू आहेत. त्यापैकी धामोते गावाच्या हद्दीत नेरळ-कळंब या राज्यमार्गालगत सध्या एका गृहसंकुलाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी दलदलीचा भाग असल्याने आणि पावसाळ्याचे पाणी याच मार्गाने नदीत जात असल्याने विकासकाने मातीचा मोठा भराव करून काम सुरू केले आहे. मुख्य रस्त्यापासून जमीन साधारण तीन फूट खाली आहे. तिथपासून मातीचा भराव करून बांधकाम वर उचलण्यात आलेले आहे. यामुळे पाण्याचा मुख्य मार्ग बंद होणार आहे. गेली काही वर्षे नेरळ-कळंब हा रस्ता सातत्याने पाण्याखाली जात आहे. येथे होणारी बांधकामे ही नियोजनशून्य पद्धतीने होत आहेत. परिणामी मुख्य नाल्याचा मार्ग वळविणे, तो खंडित करणे, अशा गोष्टी सर्रास घडत आहेत. मुळात जिल्हाधिकारी बांधकामासाठी परवानगी देतानाच त्यात मुख्य पाण्याच्या मार्गांना बाधित न करता बांधकाम करावे, अशा अटीवर बांधकाम परवानगी देत असतात. मात्र बिल्डर लॉबी आपली मनमानी करून बिल्डिंग बांधून निघून जातात. त्यानंतर तेथे राहणाऱ्या सदनिकाधारकांना भविष्यात अनेक संकटे, समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येत असते.
२०१७ पासून नेरळ-कळंब रस्ता पाण्याखाली येत आहेत. तत्कालीन प्रांताधिकारी दत्ता भडकवाल यांनी धामोते येथे प्रत्यक्ष पाहणी करून बांधकाम व्यावसायिकांना पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अजून बिल्डर लॉबीची मनमानी सुरूच आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

येथील काम हे नियोजनशून्य पद्धतीने सुरू आहे. कुणीही बिल्डर येतो आणि कुठेही बांधकाम करतो. यात स्थानिक प्रशासन असलेल्या ग्रामपंचायतीला काहीही घेणेदेणे नाही. जो तो सदस्य फक्त आपल्याला काय लाभ होईल याचाच विचार करतो. परिणामी याचे दुष्परिणाम गावाला आणि ग्रामस्थांना भोगायला लागतात.
- दत्तात्रेय विरले, ग्रामस्थ, धामोते

संबंधित बांधकाम व्यावसायिकाला आम्ही प्राधिकरणाची किंवा आणखी कोणती इमारत बांधकामाच्या परवानगीची कागदपत्रे ग्रामपंचायतीत सादर करायला सांगितले होते. मात्र त्यांनी ती अद्याप सादर केलेली नाहीत तसेच ग्रामपंचायतीचा बांधकाम ना हरकत दाखलादेखील घेतलेला नाही.
- रामदास हजारे, उपसरपंच, कोल्हारे ग्रामपंचायत

Web Title: Neral-Kalamb road likely to be submerged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.