नेरळ : शहरात एमएमआरडीएच्या माध्यमातून अंतर्गत रस्त्यांची सिमेंट काँक्रीटची कामे गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहेत. खांडा येथील रस्ता आजही अर्धवट स्वरूपात असून यामुळे खाचखळगे असलेल्या रस्त्यावरून वाहनचालक आणि ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. अनेकदा रस्त्याबाबत तक्रारी करून प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने स्थानिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, रस्त्याची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थ सुभाष नाईक हे स्वखर्चाने खड्डे भरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
नेरळ शहराची वाढती लोकसंख्या आणि नागरीकरण पाहता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुमारे २२ कोटी निधी नेरळ शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेकडे हा निधी वर्ग करून डिसेंबर २०१६ मध्ये नेरळमधील रस्त्यांच्या कामाचे कार्यांरभ आदेश निघाले. डिसेंबर २०१६ मध्ये निघालेल्या कार्यांरभ आदेशानंतर दोन वर्षे उलटून गेले तरी आजही केवळ रस्त्यांची कामेच सुरू आहेत. त्यानुसार संबंधित ठेकेदाराकडून नेरळ स्टेशन ते खांडा रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. या कामासाठी दोन कोटी ७७ लाख ६२ हजार ९५ एवढी रक्कम खर्च करून खांडा येथील सिमेंट काँक्रीट रस्ता करण्यात येत होते. रस्त्यालगतच्या सर्व घरांना नोटीसही देण्यात आल्या होत्या. मात्र, हे काम करताना येथील चिंचेच्या झाडापर्यंतच रस्ता केला गेला. त्यापुढील रस्ता कधी होईल या प्रतीक्षेत ग्रामस्थ होते. मात्र, आमसभेत हा रस्ता एवढाच असून यापुढे होणार नाही, असे रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने स्पष्ट केल्याने खळबळ उडाली होती.
त्यामुळे गेले एक वर्ष रस्त्यावर पडलेल्या असंख्य खड्ड्यांतून वाहनचालकांची तारेवरची कसरत सुरू आहे. तर वाहनचालक खड्डा चुकवताना एखादा पादचाऱ्यास ठोकरतो की काय, अशी गंभीर परिस्थिती येथे निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना या रस्त्यावरून चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. त्यामुळे अनेकदा नेरळ ग्रामपंचायत, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, या सगळ्यांचे दरवाजे ठोठावून ही साधी तक्रार कुणी एकूण घेत नसल्याने या रस्त्यासाठी येथील ग्रामस्थ सरसावले आहेत. खांडा येथील ग्रामस्थ सुभाष नाईक हे त्यांच्याकडील एक हजार विटा वापरून रस्त्यावरील खड्डे भरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, याबाबत जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग कर्जत यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
नेरळ-खांडा येथील अर्धवट राहिलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. अनेकदा नेरळ ग्रामपंचायत, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कर्जत येथे फेºया मारून लेखी पत्र व्यवहार करून येथील खड्डे भरण्याविषयी सांगितले. मात्र, पत्रांना केराची टोपली दाखवण्यात आली. या रस्त्यावरून आमचे ग्रामस्थ जीव मुठीत धरून ये-जा करतात. शासनाचे हे अधिकारी झोपेत आहेत. त्यामुळे मी स्वत: येथील खड्डे भरण्याचे जाहीर केले आहे.- सुभाष नाईक,ग्रामस्थ खांडा-नेरळ