माथेरानकरांसह पर्यटकांना प्रतीक्षा नेरळ - माथेरान सेवेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 11:33 PM2020-11-19T23:33:33+5:302020-11-19T23:33:45+5:30

ब्रिटिशांनी वसविलेले व देशातील इंधनावर चालणाऱ्या वाहनांना बंदी असलेले पर्यटनस्थळ म्हणून माथेरान नावारूपास आले आहे.

Neral - Matheran service waiting for tourists with Matherankar | माथेरानकरांसह पर्यटकांना प्रतीक्षा नेरळ - माथेरान सेवेची

माथेरानकरांसह पर्यटकांना प्रतीक्षा नेरळ - माथेरान सेवेची

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
माथेरान : माथेरानचा दिवाळी पर्यटन हंगाम ऐन भरात असताना मिनिट्रेन सफारीची पर्यटकांना असलेली ओढ दिसून येत असून नेरळ - माथेरान मिनिट्रेनच्या फेऱ्या बंद असल्याने अनेक पर्यटकांनी नाराजी बोलून दाखविली.


ब्रिटिशांनी वसविलेले व देशातील इंधनावर चालणाऱ्या वाहनांना बंदी असलेले पर्यटनस्थळ म्हणून माथेरान नावारूपास आले आहे. सर आदमजी पिरभोय यांनी स्वखर्चातून सुरू केलेली ही मिनिट्रेन सेवा एका शतकाहून अधिक काळ माथेरानच्या सेवेत अविरत सुरू आहे १९०५ साली मुहूर्तमेढ झालेली ही सेवा अखंड सुरू होती, पण मागील काही वर्षांपासून नेरळ - माथेरान सेवेकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने दोन वर्षांपासून ही सेवा पर्यटकांसाठी बंदच आहे. सुरक्षिततेचे कारण देत या मार्गावर रेल्वे प्रशासनाने कोट्यवधी रुपये आतापर्यंत खर्च केले आहेत. पण ही सेवा अजूनही बंदच आहे. ही सेवा केव्हा सुरू होईल याविषयी रेल्वे प्रशासन काहीही बोलत नसल्याने या वर्षीही माथेरानकर नेरळ - माथेरान मिनिट्रेन सेवेला मुकणार असेच चित्र सध्या दिसत आहे.


नेरळ - माथेरान मिनिट्रेन सेवा सुरू राहिल्याचा फायदा येथे येणाऱ्या पर्यटकांना मिळतो. कमी खर्चात थेट गावामध्ये येण्याचा हा एकमेव मार्ग आहे. मिनिट्रेनने आल्यास पर्यटकांना दस्तुरी या मुख्य प्रवेशद्वारावर फसव्या व्यावसायिकांकडून गावात येण्यासाठी नेहमीच होणाऱ्या वाहतुकीच्या फसवणुकीपासून सुटका तर मिळतेच, पण मोठ्या प्रमाणात आर्थिक बचतही होत असते. तसेच वाहनकोंडी, वेळेची बचत व अर्ध्या माथेरानचे दर्शन या प्रवासादरम्यान होत असल्याने पर्यटक नेरळ - माथेरान प्रवासास प्राधान्य देत असतात. दिवाळी हंगामात नेरळ - माथेरान सेवा बंद असल्याने येथे आलेल्या पर्यटकांचा हिरमोड होत असून ही सेवा सुरू असावी, अशी खंत ते बोलून दाखवत आहेत.

पर्यटकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी  
पर्यटकांची मुख्य मागणी ही नेहमीच नेरळ - माथेरान मिनिट्रेनकरिता राहिलेली आहे. दोन ते अडीच तासांच्या या रेल्वे प्रवासात त्यांना खऱ्या अर्थाने निसर्गाशी एकरूप होता येते. येथे आल्याचे सार्थक वाटते. ही सेवा उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत असून लवकरच याबाबत रेल्वेमंत्र्यांना येथील पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या नागरिकांसाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी ही मिनिट्रेन किती फायदेशीर आहे याबाबत भेट घेऊन नेरळ - माथेरान मिनिट्रेन सेवा सुरू करण्यासाठी आमच्या शिष्टमंडळामार्फत निवेदन देणार आहोत, असे नगर परिषद गटनेते प्रसाद सावंत यांनी सांगितले.

लहानपणी शाळेतून सहलीला आलो असतानाच्या मिनिट्रेन सफरीच्या आठवणी आजही ताज्या आहेत, म्हणून मुलांना घेऊन पुन्हा माथेरानला आलो असता नेरळ - माथेरान मिनिट्रेन बंद असल्याचे पाहून वाईट वाटले.
- जिग्नेश पटेल, पर्यटक, गुजरात

महाराष्ट्रात मिनिट्रेन रेल्वे सुरू असलेले माथेरान हे एकमेव ठिकाण असल्याने कुटुंबासह तिच्या सफारीचा आनंद घेण्यासाठी आलो असता नेरळ - माथेरान सेवा बंद असल्याचे समजले. त्यामुळे नेरळ ते माथेरान हा प्रवास करताना किती खर्चीक आहे हे लक्षात आले. त्यामुळे सर्वसामान्य पर्यटकांसाठी ही सेवा अखंड सुरू राहायला हवी.
- संजोग जाधव, पर्यटक, वसई
 

Web Title: Neral - Matheran service waiting for tourists with Matherankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.