पर्यटकांसाठी नेरळ-माथेरान ट्रेन राईड आता ऐतिहासिक ठरणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 11:17 PM2024-05-17T23:17:14+5:302024-05-17T23:17:28+5:30
नेरळ-माथेरान रेल्वेचे बांधकाम १९०४ मध्ये सुरू झाले आणि दोन फूट गेज लाईन अखेरीस १९०७ मध्ये वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.
- मधुकर ठाकूर
उरण : नेरळ-माथेरान भागावर सध्याच्या डिझेलवर चालणाऱ्या इंजिनला ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा लूक देऊन या नॅरो गेज रेल्वेच्या गौरवशाली भूतकाळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य रेल्वे सज्ज झाली आहे. मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेतील अभियंते आणि तंत्रज्ञांची एक विशेष टीम सदर बदल करण्यासाठी, स्टीम इंजिन हूडचे मॉडेल तयार करण्यासाठी आणि आवश्यक बदल करण्यासाठी काम करत आहेत. यामुळे इंजिन सुरळीत चालण्यासाठी आणि त्याचे ऐतिहासिक सौदर्य राखण्यासाठी मदत मिळणार आहे.
हेरिटेज लूक देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अनेक तांत्रिक प्रक्रियांचा समावेश होता. ज्यामध्ये सध्याच्या इंजिनचे हुड काढून टाकणे, हुड सारख्या नवीन ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचे उत्पादन आणि फिटिंग, सध्याच्या डिझेल इंजिनमध्ये बदल करणे, वाफेचे फिटिंग आणि ध्वनी उत्पादन प्रणाली आणि शेवटी नवीन ऐतिहासिक हुडसह इंजिनचे पेंटिंग आणि आवश्यकतेनुसार स्टिकर्ससह सजावट करणे आदी कामांचा समावेश असल्याची माहिती मध्यरेल्वे प्रशासनाच्या जनसंपर्क विभागाने प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकातुन दिली आहे.
नेरळ-माथेरान रेल्वेचे बांधकाम १९०४ मध्ये सुरू झाले आणि दोन फूट गेज लाईन अखेरीस १९०७ मध्ये वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळ्यात हा मार्ग बंद असतो. मात्र अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटल सेवा पावसाळ्यातही सुरू असते. मध्य रेल्वेने प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी या विभागात अनेक पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली आहेत.
मोबाईल चार्जिंग सुविधा, लॉकर यासारख्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज, जास्तीत जास्त आराम आणि गोपनीयता देण्यासाठी डिझाइन केलेले, पर्यटकांसाठी स्लीपिंग पॉड्स सादर करण्यासाठी सज्ज आहे. रूम सर्व्हिसेस, फायर अलार्म, इंटरकॉम सिस्टम, डिलक्स टॉयलेट आणि बाथरूम सुविधा, अशा इतर सुविधाही मिळणार आहेत. हा उपक्रम केवळ पर्यटकांसाठी एकंदर अनुभवच वाढवणार नाही तर पर्यटनाला चालना देऊन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेतही महत्त्वपूर्ण योगदान देणारा ठरणार आहे.
वैशिष्ट्ये :
- मध्य रेल्वे नेरळ-माथेरान टॉय ट्रेनच्या इंजिनला ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचे रुप देणार असून, पर्वतीय रेल्वेच्या वैभवशाली प्रवासाचा अनुभव पुन्हा जिवंत करणार आहे.
- मध्य रेल्वेचे माथेरान हे सुट्टीचे सर्वात आवडते ठिकाण आहे आणि टॉय ट्रेन सेवा जी नॅरो गेज मार्गावर मध्य रेल्वेद्वारे चालवली जाते, नेरळ ते माथेरान पर्यंतच्या उंच पर्वतरांगा पाहणे हे प्रत्येक पर्यटकाचे स्वप्न असते.
- नेरळ ते माथेरान प्रवास केलेल्या १,४८१ प्रवाशांनी ९९% आणि माथेरान ते नेरळ प्रवास केलेल्या १,३०४ प्रवाशांनी दि. १०.५.२०२४ ते दि. १०.५.२०२४ ते २०२५ पर्यंत ८८% प्रवास केल्यामुळे टॉय ट्रेन सेवा प्रचंड लोकप्रिय आहे. भारतातील काही ऐतिहासिक पर्वतीय रेल्वेपैकी एक असलेल्या नेरळ-माथेरान लाइट रेल्वेने १९०७ मध्ये स्टीम इंजिनद्वारे चालवलेल्या पहिल्या टॉय ट्रेन सेवेसह ११६ गौरवशाली वर्षे पूर्ण केली आहेत.
- आता पर्यटकांना नेरळ-माथेरान राईड आता ऐतिहासिक ट्रेनमध्ये प्रवास करण्याचा, निसर्ग जवळून पाहण्याचा आणि माथेरानच्या नैसर्गिक वातावरणातील शांततेत रममाण होण्याचा विलोभनीय अनुभव मिळणार आहे.असा दावा मध्यरेल्वे प्रशासनाच्या जनसंपर्क विभागाने प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकातुन केला आहे.