नेरळ - माथेरान मिनीट्रेन सेवा उदासीनतेच्या गर्तेत; लोकोशेडचे काम अपूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 11:00 PM2020-03-11T23:00:53+5:302020-03-11T23:01:53+5:30
रेल्वेमार्गाच्या निधीचा अन्यत्र वापर करण्यात येत असल्याच्या तक्रारी; स्थानिकांसह पर्यटकांमधून नाराजी
मुकुंद रांजाणे
माथेरान : माथेरान पर्यटनस्थळाचा केंद्र्रबिंदू असलेली नेरळ - माथेरान मिनीट्रेन सेवा रेल्वे प्रशासनाच्या उदासीनतेची बळी पडत आहे. येथील मार्गाचे काम कूर्मगतीने सुरू असल्याने ही सेवा येत्या पर्यटन हंगामामध्ये तरी सुरू होईल का? असा प्रश्न स्थानिक तसेच व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे.
माथेरानमध्ये पर्यटकांचे खास आकर्षण म्हणजे मिनीट्रेन सफर. या मिनीट्रेनची सफर करण्यासाठी देशविदेशातून पर्यटक माथेरानला भेट देतात; मात्र हीच मिनीट्रेन बंद असल्यास पर्यटनस्थळावर मंदीची अवकळा पसरते. गतवर्षी पावसाळ्यात नेरळ - माथेरान मिनीट्रेन मार्गाची मोठी हानी झाली होती.
अनेक ठिकाणी दरडी पडल्या, रेल्वे मार्गाखालील भराव वाहून गेल्याने माथेरानला येणारी गाडी बंद झाली होती. त्याचा फटका येथील अमन लॉज ते माथेरान शटल सेवेसही बसला होता. त्या वेळी माथेरान येथे एक सुसज्ज लोकोशेड असावे, असा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यादृष्टीने कामही सुरू करण्यात आले होते.
सध्या नेरळ - माथेरान मार्गाची डागडुगी करून तात्पुरती माथेरानपर्यंत गाडी येण्यापुरते काम केले गेले व शटलसेवा सुरू झाली; पण लोकोशेडचे काम मात्र जवळ जवळ बंद झाले आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा असा प्रसंग उद्भवल्यास मिनीट्रेन पुन्हा बंद होऊ शकते. पर्यटकांचे खास आकर्षण असलेली नेरळ - माथेरान सेवा लवकर सुरू व्हावी, अशी मागणी माथेरानकरांकडून जोर धरत आहे.
प्रत्येक पावसाळ्यात माथेरान - नेरळ मार्गाची हानी होते व रेल्वे प्रशासनाकडून मार्गावरील सेवा खंडित करण्यात येते. प्रत्येक वेळी माथेरानकरांना सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. रेल्वे मार्गासाठी प्रशासनाकडून मोठा निधी उपलब्ध होत असला तरी प्रत्यक्षात तो मार्गाच्या दुरुस्तीऐवजी इतरत्र खर्च केला जातो. त्यामुळे मिनीट्रेनच्या मार्गातील धोकादायक ठिकाणे अधिकच धोकादायक होत आहेत. दर पावसाळ्यात हीच स्थिती उद्भवत असल्याने कामचुकार अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
माथेरान स्थानकात लोकोशेडचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून काम अपूर्णावस्थेत असून याच ठिकाणी लहान मुले खेळत असतात. लोकोशेड कामाच्या लोखंडी सळया वर असल्याने तसेच पावसाळ्यात पाणी साठून एखाद्या व्यक्तीला अथवा लहान मुलांना अपघाताला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकोशेडचे काम पूर्ण होणार नसेल तर या ठिकाणी भराव टाकण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.