नेरळ-शेलू रेल्वेमार्ग दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 11:35 PM2019-08-05T23:35:04+5:302019-08-05T23:35:09+5:30
बदलापूर-कर्जत वाहतूक पूर्ववत; पावसामुळे वाहून गेले मेन लाइनवरील खडी, दगड
नेरळ : रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने नेरळ-शेलू मार्गावर मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील खडी आणि दगड वाहून गेले होते. त्यामुळे खंडित झालेली मध्य रेल्वेची बदलापूर-कर्जत दरम्यानची वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे रविवारी दिवसभर न धावलेली रेल्वे वाहतूक सोमवारी सायंकाळपर्यंत सुरू करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असून आतापर्यंत तीन मालगाड्या भरून दगड आणि खडी आणण्यात आली आहे.
शनिवारी रात्रीपासून असलेल्या पावसाने शनिवारी पहाटेनंतर मध्य रेल्वेच्या बदलापूर-कर्जत दरम्यान वाहतूक बंद पडली होती. रविवारी सकाळी मेन लाईनपासून काही अंतरावर वाहणाऱ्या उल्हासनदीला आलेल्या पुराचे पाणी नेरळ आणि शेलू या रेल्वे स्थानकामध्ये असलेल्या शेलू एसएसपी बी केबिनच्या पुढे नेरळकडील ३०० मीटरचा डाऊन मार्गावरील मातीचा भराव वाहून जातानाच त्या ठिकाणी असलेले दगड आणि खडी ही मोठ्या प्रमाणात वाहून गेली होती. त्याचवेळी पहाटेपासून य भागातील सिग्नल व्यवस्था बंद पडल्याने रविवारी दिवसभर एकही गाडी या मार्गावरून पुढे गेली नाही. मोठ्या प्रमाणात रेल्वे मार्गाचे झालेले नुकसान लक्षात घेता मध्य रेल्वेच्या बदलापूर-कर्जत मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील ही स्थिती लक्षात घेऊन तात्काळ उपाययोजना करण्यास रेल्वेच्या पीडब्लूआय विभागाने तयारी सुरू केली. कर्जत येथून अप मार्गाने सायंकाळी ४१ डब्यांची मालवाहू गाडी रेल्वे ट्रकच्या खालील माती वाहून गेलेल्या ठिकाणी पोहचली होती. त्या मालगाडीमधील दगड हे खांब क्रमांक ८३१७ पासून ८३१२ या दरम्यान टाकण्यासाठी पीडब्लूआय विभागातील २०० कर्मचारी लावले होते. त्या रेल्वे कामगार तसेच कंत्राटी कामगार यांनी दगड टाकून पडलेले खड्डे भरण्याचा प्रयत्न केला.
५ आॅगस्ट रोजी सकाळी मध्य रेल्वेच्या तांत्रिक विभागाने २४तास बंद असलेली सिग्नल यंत्रणा सुरू केल्याने प्रवाशांना हायसे वाटले होते. परंतु मध्य रेल्वेने बदलापूर-कर्जत दरम्यान लोकल सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केल्याने प्रवासी कोणीही बाहेर निघाले नव्हते. सोमवारी दुपारी कर्जत येथून एका मालवाहू गाडीमध्ये खडी आणण्यात आली तर वांगणी येथून एका मालवाहू गाडीमधून दगड आणण्यात आले आहेत. त्या माध्यमातून मेन लाईनवरील शेलू-नेरळ दरम्यानचा मार्ग पुन्हा सुस्थितीत करण्याचे काम मध्य रेल्वेकडून सुरू आहे. त्या ठिकाणी ३०० मीटरचा मार्ग पुन्हा तयार करण्यासाठी मध्य रेल्वेचे १०० कामगार आणि कंत्राटी असे २०० कामगार काम करीत आहेत. पीडब्लूआय विभागाचे वरिष्ठ अभियंता वाय पी सिंग हे जातीने उभे राहून टॅÑक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दोन्ही ंगाड्यांमधील दगड टाकून त्यावर खडी टाकण्याचे काम सुरू होते.
नेरळ शेलू दरम्यान टॅÑकमधील वाहून गेलेली माती आणि त्यावर खडी टाकण्याचे काम करून झाल्यानंतर मेन लाइनवरील ट्रॅक उपनगरीय सेवा आणि एक्स्प्रेस गाड्या जाण्यासाठी सुस्थितीत आहे किंवा नाही? हे तपासले जाणार आहे. त्यासाठी एक मालवाहू गाडी वांगणी येथून सोडली जाईल. त्यानंतर उपनगरीय सेवा सुरू करण्याचा निर्णय होईल.
- वाय. पी. सिंगस,
अभियंता, मध्य रेल्वे.