नेरूळ-उरण रेल्वे, प्रवासी-कंटेनर वाहतुकीस उपयुक्त ठरणारा जासई उड्डाणपूल कार्यान्वित होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2022 06:34 PM2022-11-28T18:34:39+5:302022-11-28T18:36:29+5:30
वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास मदत होणार
मधुकर ठाकूर, उरण: भू-संपादनासाठी प्रकल्पग्रस्तांचा विरोध, कोरोना महामारी आणि इतर काही समस्यांमुळे मागील चार वर्षांपासून कासवगतीने सुरू असलेला रेल्वे, प्रवासी आणि वाहतूकीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा जासई उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.१.२ किमी लांबीचा उड्डाणपूल मार्च अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याने या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याची माहिती राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण विभागाचे मुख्य अभियंता यशवंत घोटकर यांनी दिली.
जेएनपीटी -मुंबई रोड कंपनी व राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून जेएनपीए -आम्रमार्ग या मार्गावर चार टप्प्यापैकी तिसऱ्या टप्प्यातील जासई उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.१.२ मीटर लांब व २६ मीटर रुंदीचा उड्डाणपूल ५२ पिल्लवर उभारण्यात येत आहे.उड्डाणपुलाच्या कामाला २०१९ साली सुरुवात करण्यात आली होती.मात्र उड्डाणपूलाच्या उभारण्यासाठी शेतकऱ्यांच्या जागा भू-संपादन करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचा झालेला विरोध, कोरोना महामारीमुळे कामात आलेले विविध अडथळे आणि इतर समस्यांमुळे मागील चार वर्षांपासून जासई उड्डाण पुलाचे काम अडखळत कासवगतीने सुरू होते.मात्र यातील अनेक अडथळे दूर झाल्यानंतर जासई उड्डाण पुलाच्या कामाने वेग घेतला आहे.वेगाने प्रगतीपथावर असलेल्या उड्डाणपुलाचे काम आणखी कोणत्याही समस्या उद्भभवल्या नाहीत तर येत्या मार्च २०२३ अखेरपर्यंत पुर्णत्वास जाऊन वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचा ठाम विश्वास राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण विभागाचे मुख्य अभियंता यशवंत घोटकर यांनी व्यक्त केला आहे.
उरण- नेरूळ रेल्वे मार्गावरील व उरण- पनवेल- नवी मुंबई यांना जोडणारा जासई उड्डाण पुल महत्वाचा दुवा आहे.याच उड्डाणपूलाच्या खालुन उरण- नेरूळ रेल्वे धावणार आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. मात्र मार्च २०२३ अखेरीस जासई उड्डाण पुल कार्यान्वित झाल्यानंतर उरण, जेएनपीए, नवी मुंबई परिसरातील नागरिक, प्रवासी व वाहतूकदारांना सातत्याने सतावणारी वाहतूक कोंडीची समस्या बहुतांशी दूर होण्यास मदत होईल अशी अपेक्षाही राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण विभागाचे मुख्य अभियंता यशवंत घोटकर यांनी व्यक्त केली आहे. रायगड, मुंबईतील हजारो मच्छीमारांसाठी वरदान ठरणारा एक हजार मच्छीमार बोटी क्षमतेचे करंजा मच्छीमार बंदर, उरणकरांना मागील ५० वर्षांपासून प्रतिक्षा लागुन असलेला महत्वाकांक्षी २७ किमी लांबीचा नेरुळ-उरण रेल्वे मार्ग, शिवडी-न्हावा सि-लिंक आणि इतर जासई उड्डाण पुल या महत्त्वाचे प्रकल्प येत्या २०२३ मध्येच कार्यान्वित होणार आहेत. यामुळे उरणकरांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.