नेरळ - माथेरान मिनीट्रेन होतेय सज्ज
By admin | Published: October 8, 2015 12:01 AM2015-10-08T00:01:49+5:302015-10-08T00:01:49+5:30
नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पावसाळी सुटीवर असून १५ आॅक्टोबरला ही सुटी संपत आहे. नव्या पर्यटन हंगामासाठी पर्यटकांची लाडकी माथेरान राणी सज्ज होत आहे.
- विजय मांडे, कर्जत
नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पावसाळी सुटीवर असून १५ आॅक्टोबरला ही सुटी संपत आहे. नव्या पर्यटन हंगामासाठी पर्यटकांची लाडकी माथेरान राणी सज्ज होत आहे. मिनी ट्रेनचे प्रवासी डबे दुरु स्त होऊन येत असताना मात्र मिनी ट्रेनसाठी नवीन इंजिन खरेदीबाबत रेल्वे प्रशासन कोणतेही धोरण स्वीकारत नसल्याने अर्ध्या वाटेवर बंद पडणारे इंजिन हे रडगाणे पुढे सुरूच राहण्याची शक्यता अधिक आहे.
१६ जूनपासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेन १५ आॅक्टोबरपर्यंत पावसाळी सुटीसाठी म्हणजे दुरुस्तीच्या कामासाठी जात असते. ब्रिटिश काळापासून पावसाळ्यात मिनी ट्रेनची प्रवासी वाहतूक बंद असते. या कालावधीत मिनी ट्रेनचा २१ किलोमीटरचा मार्ग, प्रवासी डबे, इंजिन यांची दुरु स्तीची कामे केली जातात. पुन्हा नव्या दमाने मिनी ट्रेनचा पर्यटन हंगाम सुरू करण्यासाठी मिनी ट्रेन सध्या सज्ज होत आहे. त्यासाठी मिनी ट्रेनची जुनी असलेली इंजिने दुरु स्त करून परळ येथून आणण्यात येत आहेत. तर त्याचवेळी प्रवासी डबेदेखील दुरु स्त करून नेरळ लोकोमध्ये दाखल होत आहेत.
नवरात्र उत्सव काळात मिनी ट्रेन सुरू होत असल्याने माथेरानकर आणि व्यावसायिक यांच्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा आहे. माथेरानचा पर्यटन व्यवसाय हा अनेक दशकांपासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेनवर अवलंबून आहे.
१५ आॅक्टोबरनंतर सुरू होणारा नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचा पर्यटन हंगामासाठी नेरळ लोको शेड तयार होत आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेनसाठी इंजिने ही मोठी समस्या निर्माण झाली आहे.
मागील वर्षाच्या पर्यटन हंगामात नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन दहा - बारा वेळा रु ळावरून घसरून प्रवासी फेरी रद्द करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. त्यामुळे गेली अनेक वर्षे नवीन इंजिन रेल्वेने खरेदी करावे, अशी मागणी होत आहे. मात्र रेल्वेकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे माथेरानकर आणि पर्यटकांमध्ये नाराजी आहे.
चारपैकी दोन रेल्वे इंजिने दार्जिलिंग येथे
येथील सुस्थितीत असलेली चारपैकी दोन इंजिने रेल्वे बोर्डाने दार्जिलिंग येथे तेथील मिनी ट्रेनसाठी ठेवली आहेत. तेथे देखील गेली चार वर्षे एनडीएम ५०१, ५०२ ही दोन्ही इंजिने धूळखात पडून आहेत. ती दोन्ही इंजिने वापरायची नव्हती तर येथून नेली कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.