नेरळ : गेले वर्षभर नेरळ हुतात्मा चौक ते माथेरान टॅक्सी स्टँडपर्यंत २४ कोटी रुपये खर्चून ७ किमीचा घाट रस्ता एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येत आहे. हा घाटरस्ता या अगोदर कार्यकारी अभियंता अरविंद धाबे हे करत होते, परंतु आर्थिक लाभ घेण्यासाठी धाबे यांना दूर करून या रस्त्याचे काम कार्यकारी अभियंता जयवंत डहाणे यांनी हातात घेतले. मात्र, इतके दिवस उलटूनही कार्यकारी अभियंता डहाणे हे स्वत: घाट रस्त्यात काम पाहायला येत नसून ती जबाबदारी कनिष्ठ अभियंता यांच्या माथी मारली आहे. त्यामुळे हे काम उत्तम दर्जाचे होत आहे हे सांगणेही डहाणे यांना कठीण झाले आहे. घाट रस्त्यात कड्याच्या बाजूला संरक्षक कठडे बांधले आहेत ते एकदम निकृष्ट दर्जाचे असून काही दिवसांपूर्वी पर्यटकांची होंडा सिटी गाडी या कठड्यावर आदळून काही पर्यटक जखमी झाले होते तर गाडीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जुन्या कठड्यावर ग्रीट, सिमेंट व थोडी रेती वापरून नवीन कठडे तयार केले आहेत काही ठिकाणी कठड्यांमधील अंतर जास्त प्रमाणात ठेवले आहे, तर काही ठिकाणी कठड्यांची उंची कमी केलेली आहे. त्यामुळे नक्कीच याचा फायदा ठेकेदाराला होणार आहे, नियमानुसार हे काम सुरू नाही असा आरोप टॅक्सी चालक मालक संघटनेने केला आहे.तसेच नियमानुसार १५ मेनंतर डांबरीकरण होत नाही.असे असताना माथेरानच्या घाट रस्त्यात सर्रास डांबरीकरण चालू आहे.त्यामुळे पावसाळ्यात हे डांबरीकरण वाहून गेल्यास याला कंत्राटदार व प्राधिकरण जबाबदार राहील, असे कार्यकारी अभियंता जयवंत डहाणे यांनी सांगितले.ठेकेदाराचा आर्थिक फायदा करण्याच्या हेतूने एमएमआरडीएने हे काम सर्व नियम धाब्यावर बसवून सुरू केले आहे. हे काम एकदम निकृष्ट दर्जाचे आहे, याची सखोल चौकशी करावी.- संतोष शेळके, अध्यक्ष, नेरळ माथेरान टॅक्सी चालक मालक संघटना
नेरळ-माथेरान घाट रस्ते कामावर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 2:38 AM