मुद्रा कार्ड ठरणार उपजीविकेचा नवा आधार
By admin | Published: October 1, 2015 01:57 AM2015-10-01T01:57:38+5:302015-10-01T01:57:38+5:30
मुद्रा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील विविध बँकांच्या ४११ शाखांच्या माध्यमातून ३ हजार ७४५ लघुउद्योजकांना ९ कोटी ८८ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले
अलिबाग : मुद्रा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील विविध बँकांच्या ४११ शाखांच्या माध्यमातून ३ हजार ७४५ लघुउद्योजकांना ९ कोटी ८८ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले असल्याची माहिती शासन प्राधिकृत रायगड जिल्हा अग्रणी बँक असणाऱ्या बँक आॅफ इंडियाचे अग्रणी बँक व्यवस्थापक टी.मधुसूदन यांनी दिली. रायगड जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत मुद्रा कार्डचे वितरण संबंधित लघुउद्योजकांना जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी ते बोलत होते.
लघुउद्योजकांना त्यांचा व्यवसाय, उद्योग वृध्दिंगत करण्यास सहाय्यभूत ठरेल अशी महत्त्वपूर्ण पंतप्रधान मुद्रा योजना नुकतीच सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मिळालेले मुद्रा कार्ड हे संबंधितांना व त्यांच्या कुटुंबांना उपजीविकेसाठी निश्चितच मोठा आधार ठरेल असा विश्वास जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. छोट्या उद्योजकांना उद्योग सुरु करण्यासाठी बँकांनी या योजनेमार्फत आपला मदतीचा हात दिला आहे. आता प्रत्येक उद्योजकाने या योजनेचा लाभ घेऊन आपला उद्योग यशस्वीरीत्या सुरु करावा व आपल्या कुटुंबाची प्रगती करावी. प्रत्येक कुटुंबाच्या प्रगतीतूनच देशाची प्रगती होणार आहे. उद्योजकांनी चांगला उद्योग केल्यास व कर्जाची योग्यरीतीने परतफेड केल्यास ते पुढील मोठ्या कर्जासाठी पात्र ठरु शकतील, असे सांगून त्यांनी सर्व लघुउद्योजकांना शुभेच्छा दिल्या.
मुद्रा योजनेत शिशुकर्ज, किशोर कर्ज आणि तरु ण कर्ज अशा तीन वर्गवारीत कर्ज योजना उपलब्ध करु न देण्यात आली आहे. उद्योग सुरु करायचा आहे अशा इच्छुक उद्योजकांनी आपल्या जवळच्या बँकेत संपर्क साधावा, असे आवाहन टी.मधुसूदन यांनी केले. यावेळी बँक आॅफ इंडियाचे मनोजकुमार करण, स्टेट बँक आॅफ इंडिया पेणचे संजय कुमार आदी उपस्थित होते.
बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, बँक आॅफ बडोदा, पंजाब नॅशनल, इंडियन ओवरसिज, युनियन बँक आॅफ इंडिया, एचडीएफसी, आयसीआयसीआय, आयडीबीआय, या बँकांनी मंजूर केलेल्या मुद्रा कार्डचे वितरण करण्यात आले. (प्रतिनिधी)