रायगड ः केंद्रातील माेदी सरकारने कामगार, शेतकरी यांना देशाेधडीला लावणारे कायदे पारीत केले आहेत. आता त्यापाठाेपाठ माेदी सरकार विजेबाबत कायदा आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांवर विज दर वाढीचे संकट आेढवणार असल्याने या विराेधात शेकाप जन आंदाेलन उभारणार आहे. यासाठी आजच्या संविधान दिनी सर्वांनी संघटीत हाेऊन याचा मुकाबला करुया असे आवाहन शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले.
कृषी, कामगार कायद्या विराेधात शेकापने आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चाचे आयाेजन केले हाेते. त्याप्रसंगी जाहिर सभेत आमदार पाटील बाेलत हाेते.न्याय, समता, बंधुतेची त्रिसुत्री भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या संविधान दिनी देशाला दिली हाेती. मात्र केंद्रातील माेदी सरकार नेमके घटनेच्या विराेधात कृत्य करत आहे. देशातील कामगार, कष्टकरी, शेतकरी, दलीत यांना देशाेधडीला लावून ठराविक उद्याेजकांच्या पुढे लाेटांगण घालत आहे, अशी जहरी टीका आमदार पाटील यांनी केली.माेदी सरकारने किती प्रयत्न केले तरी, देशातील नागरिक त्यांच्या पुढे झुकणार नाही हेच आपल्याला दाखवायचे आहे. यासाठी सर्वांनी संघटीत हाेऊन संघर्ष करण्याची तयारी करा. शेकाप कायम तुमच्या साेबत आहे, असे आवाहन त्यांनी केले.राेहा-मुरुड तालुक्यातील प्रस्तावित प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना सिडकाेच्या नियमानुसार लाभ दिला पाहीजे. त्यांच्या जमिनी याेग्य दर देतानाच त्यांना साडे बावीस टक्के विकसीत भूखंड देणे गरजेचे आहे असेही, त्यांनी स्पष्ट केले.शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लवकरच मुंबई-मंत्रालयावर लाॅंगमार्च काढणार आहे.
त्यामध्ये स्वतः पायी चालत जाणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.काेराेना विराेधातील लढाई आपण लवकरच जिंकू असा विश्र्वास देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र माेदी यांनी देशवासीयांना दिला हाेता. मात्र आजची रुग्ण संख्ये तब्बल 92 लाखांच्या पुढे गेली आहे, तर लाखाे नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आराेग्याच्या बाबतीमधील माेदी सरकारची धाेरणे चुकली आहेत अशी जाेरदार टीका माकम नेते काॅ. अशाेल ढवळे यांनी केली.विविध कायदे पारीत करुन भांडवलदारांना पाठीशी घालून कामगार, कष्टकरी, शेतकरी सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर आणण्याचे काम माेदी सरकार करत आहे. या विराेधात सर्वांनीच लढा देण्यासाठी सज्ज झाले पाहीजे असे आवाहनही काॅ. ढवळे यांनी केले. हाथरस सारख्या घटनांनी माेदी सरकारची भूमिका काेणाच्या बाजूने आहे हे सिध्द हाेत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. याप्रसंगी माजी आमदार धैर्यशील पाटील, माजी आमदार सुभाष पाटील, आस्वाद पाटील, रायगड जिल्हा परिषद सदस्य भावना पाटील, प्रितम म्हात्रे यांच्यासह अन्य मान्यवर आणि पदाधिकारी कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.दरम्यान, केंद्राने पारीत केलेल्या कृषी आणि कामगार कायद्याची महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी करु नका असे मागणी करणारे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले.