कर्जत : शतक महोत्सव साजरा केलेल्या आणि जागतिक हेरिटेज वारसासाठी प्रतीक्षेत असलेल्या नेरळ-माथेरान मिनीट्रेन नव्या दिमाखात येताना दिसत आहे. मिनीट्रेन मार्गावरील अमन लॉज या महत्त्वाच्या स्थानकाचा कायापालट सध्या मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे. माथेरान-अमनलॉज शटल सेवेमुळे अमन लॉज स्थानकाचे वाढलेले महत्त्व लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष लक्ष दिले आहे. बदलत असलेले अमनलॉज स्थानक मध्य रेल्वेवरील आकर्षक स्थानक असा नवीन लूक हे स्थानक घेत आहे. यामुळे पर्यटकांसह माथेरानकरही समाधानी आहेत. १९०७ मध्ये सुरू झालेल्या नेरळ-माथेरान मिनीट्रेन मार्गावर जुम्मापट्टी, वाटरपाइप आणि अमनलॉज ही स्थानके येतात. त्यातील अमनलॉज स्थानकाच्या परिसरात राज्य पर्यटन महामंडळाचे विश्रामगृह आहे. त्यामुळे तेथे जाण्यासाठी नेरळ-माथेरान मिनीट्रेनमधून प्रवास करणारे पर्यटक उतरत असतात. मागील चार वर्षांपूर्वी नेरळ-माथेरान मिनीट्रेन मार्गावर माथेरान-अमनलॉज अशी मिनीट्रेनची शटल सेवा सुरू करण्यात आली.त्यावेळी अमनलॉज स्थानकात शटल सेवेची मिनीट्रेन ही अर्ध्याहून अधिक फलाटाबाहेर थांबली जात होती.कारण आठ प्रवासी डबे आणि दोन इंजिन यांची लांबी अधिक असल्याने होणारी अडचण लक्षात घेऊन फलाटाची लांबी वाढविण्याची मागणी होत होती. रेल्वेने तेथे एका वेळी दोन मिनीट्रेन थांबतील अशी व्यवस्था करताना दोन ट्रॅक तयार केले.मात्र त्यासाठी एकच फलाट उपलब्ध असल्याने ज्यावेळी दोन मिनीट्रेन अमनलॉज स्थानकात उभ्या असतील त्यावेळी प्रवासी पर्यटकांची धावपळ होत होती. त्यातच मिनीट्रेनची शटल सेवा ही सकाळी नऊपासून दुपारी चार वाजेपर्यंत असल्याने तेथे प्रवाशांना उभे राहण्यासाठी कुठेही निवारा शेड नव्हते. त्यामुळे उन्हा -पावसात पर्यटक, प्रवासी उभे असायचे. माथेरानमधील पाऊस प्रचंड असतो, त्यामुळे माथेरानमध्ये एका ठिकाणी उभे राहणे शक्य नसते. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन अमन लॉज स्टेशनचा नवीन आराखडा रेल्वेने तयार केला आहे. त्यात प्रवाशांना निवारा शेड, बसण्यासाठी बेंच, आकर्षक फलाट बांधण्यात येत आहेत. निवारा शेडचे बांधकाम पूर्ण झाले असून छपरामुळे संपूर्ण अमन लॉज परिसराला नवीन लूक प्राप्त झाला आहे. (वार्ताहर)
अमन लॉज रेल्वे स्थानक घेतेय नवीन लूक
By admin | Published: March 17, 2016 2:26 AM