पदवीधर तरुणांचा नवा आदर्श; आधुनिक पद्धतीने शेती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 11:43 PM2019-12-31T23:43:16+5:302019-12-31T23:43:36+5:30
नोकरीसाठी शहरात स्थलांतर न करता गावातच मिळवितात उत्पन्न
- सिकंदर अनवारे
दासगाव : महाड तालुक्यातील दुर्गम अशा आदिस्ते गावातील तीन तरूणांनी एकत्रीत येत परंपारिक शेतीला बगल देत आधुनिक शेतीकडे पावले टाकली आहेत. विशेष म्हणजे हे तिनही तरूण पदवीधर असून त्यांनी शहराचा रस्ता न धरता गावातच उत्पन्नाचे साधन तयार केले आहे. दररोज लागणारा भाजीपाला पीक काढून त्याची विक्री याच परिसरात केली जात आहे. गाव सोडून स्थलांतरित होणाऱ्या तरूणांपुढे हा एक नवा आदर्शच आहे.
खाडीपट्टा विभागात दूषित पाण्याने शेती नापीक झाल्याच्या चर्चा कायम होत असतात. शिवाय या परिसरात असलेल्या खैरे धरण प्रकल्पातील पाण्याचा वापर आता शेतीसाठी होत नाही तर केवळ पिण्याच्या पाण्यासाठी होत आहे. शिवाय शेतीमध्ये उत्पन्न नसल्याने तरूणांचा कल मोठ्या शहरांमध्ये नोकरीकडे आहे. याला बगल देत आदीस्ते गावातील तीन सुशिक्षीत तरूण मात्र शेतीकडे वळले आहेत. एवढेच नव्हे तर दररोज लागणाºया भाज्या पिकवून याठिकाणीच विक्री करून उत्पन्नाचे नवे साधन त्यांनी तयार केले आहे. आदिस्ते गावातील सुनिल साळवी, अंकुश मौले, सुरज दवंडे या तिघांनी हा प्रयत्न केला आहे. गेल्या दोन वषार्पासून ते आपल्या दिड एकर परिसरात केवळ पालेभाजी आणि फळभाजी पीक घेत आहेत. सामूहिक शेतीच्या माध्यमातून हे तिघेही एकत्रीत आले आणि त्यांनी परिसरातच उत्पन्नाचे साधन तयार केले.
यातील सूरज दवंडे याच्या वडिलांनी या शेतीला सुरवात केली होती. उन्हाळयात धरणाच्या पाण्यावर शेती करण्यास सुरवात केली. त्यांचा वारसा पुढे नेत सूरज दवंडे, सुनील साळवी, अंकुश मौले या तीन तरूणांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत शेती करण्यास सुरवात केली. सूरज याने शेती विषयातील अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. यामुळे परंपारिक भातशेतीबरोबर फळभाजी आणि पालेभाजी घेणे फायदेशीर असल्याचे लक्षात येताच या तीन तरूणांनी एक होत हा प्रयोग यशस्वी केला. भेंडी, गवार, चवळी, टोमॅटो, वांगी अशी विविध पिके वेगवेगळया हंगामात घेतली जात आहेत. दिड एकरात ते ही शेती करत आहेत. या पावसाळयात त्यांना भेंडीचे उत्पादन चांगल्या प्रकारे मिळाले. येणाºया पिकाला या परिसरातच बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने शहरात पाठवण्याचा संबध येत नाही. आदिस्ते, वलंग, रोहन ही तीन मोठी गावे असल्याने दुकानांतून किंवा घरातून विक्री होते.
उन्हाळ्यात होतो धरणाच्या पाण्याचा उपयोग
शेजारीच खैरे धरण प्रकल्प आहे. हा प्रकल्प केवळ सिंचनाकरिता तयार करण्यात आला होता. यातील पाणी शेतकरी आता केवळ पिण्याकरिता वापरतात, तर नदीकिनारील शेती दूषित पाण्यामुळे करणे अनेकांनी सोडून दिले आहे.
या नदीतील पाणी दूषित असले, तरी धरणाचे पाणी शेतीसाठी वापरणे शक्य असले, तरी त्याचा वापर होत नाही. मात्र, हे तरुण उन्हाळ्यात याच धरणातील पाण्याचा वापर करून शेती करत आहेत.
शिक्षण घेऊन शहरात नोकरी न करता शेतीतून गावातच उत्पन्नाचे साधन तयार केलेल्या या तरुणांचा परिसरातील तरुणांपुढे एक नवा आदर्शच निर्माण झाला आहे. शिवाय दूषित पाण्याचे कारण पुढे करत, जे उन्हाळ्यात शेती करत नाहीत, त्यांच्यापुढेदेखील या तरुणांची शेती प्रेरणा देणारी ठरणार आहे.
आमच्या गावाच्या शेजारीच धरण आहे. या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी होत असतो. मात्र, शिक्षित तरुणांनी अशा प्रकारे धरणाच्या पाण्यावर शेती अथवा अन्य शेतीपूरक व्यवसाय उभा केल्यास शहरांकडे जाण्याची पाळी येणार नाही. सध्या आम्ही केवळ भाजी पिकवितो आणि याच परिसरात विक्री करतो.
- सुनिल साळवी, तरूण शेतकरी