लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : शिवभक्तांना सुरक्षितपणे किल्ले रायगडावर जाता यावे यासाठी रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून नवा सुरक्षित आणि वैशिष्ट्यपूर्ण रोपवे उभारण्याची घोषणा रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे यांनी शुक्रवारी महाड येथे केली. रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ले रायगडावर सुरू असलेल्या संवर्धन कामांची पाहणी करण्यासाठी खा. संभाजीराजे गडावर आले होते. या पाहणीनंतर महाड येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली.
सध्या रायगडावर जाण्यासाठी उपलब्ध असलेला रोपवे जागेच्या वादामुळे बंद ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे गडावर येणाऱ्या पर्यटकांना गैरसोय सहन करावी लागत आहे. ही बाब पत्रकारांनी खा. संभाजीराजे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर बोलताना प्राधिकरणाच्या माध्यमातून नव्या रोपवेसाठी ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून हा नवा रोपवे गडाच्या वैभवाला साजेसा असा उभारण्यात येईल, असे खा. संभाजीराजे म्हणाले.
हत्ती तलावाला पुन्हा गळती लागली असून, या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही लोकांनी केला आहे. त्यावर भाष्य करताना, या तलावाची गळती काढण्याचे काम केवळ ६० ते ७० टक्केच झालेले आहे. ज्या भागातील गळती काढण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी कोणतीही समस्या नसून, ज्या भागात काम झालेले नाही, त्याच भागात ही समस्या निर्माण झालेली आहे. ते काम आता सुरू करण्यात आलेले आहे. जर काम योग्य पद्धतीने झाले नसते तर हा तलाव पूर्ण भरला नसता. या कामामध्ये एका रुपयाचाही भ्रष्टाचार झालेला नाही आणि तो होऊ देणारही नाही, असा विश्वासही खा. संभाजीराजे यांनी दिला.
महाड - रायगड मार्गाचे काम योग्य पद्धतीने न करणाऱ्या ठेकेदाराकडून हे काम काढून घेतले आहे. त्याला काळ्या यादीत टाकले असून, नवी निविदा प्रक्रिया सुरू केल्याची माहितीही खा. संभाजीराजे यांनी दिली. या वेळी शिवराज्याभिषेक संस्थेचे फत्तेसिह सावंत उपस्थित होते.
अकरा कोटींचा निधी पुरातत्त्व विभागाकडे हस्तांतरितnगडावरील संवर्धन आणि उत्खननाचे काम पुरातत्त्व विभागामार्फत केले जात आहे. या कामासाठी अकरा कोटी रुपयांचा निधी प्रधिकरणाने पुरातत्त्व विभागाकडे हस्तांतरित केला आहे. मात्र ही कामे अत्यंत संथगतीने सुरू आहेत. या गतीने ही कामे पूर्ण होण्यास पंचवीस वर्षे लागतील असे खा. संभाजीराजे म्हणाले.n गावांतील रस्त्यांची कामे जानेवारी २०२१ पर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. सातपुते यांनी दिली.