कळंबोली : समाजाबरोबर कुटुंबीयांनी झिडकारल्यानंतर एचआयव्हीची लागण झालेल्यांच्या आयुष्यात नैराश्य येते. त्यांना आधाराची गरज निर्माण होते. अशा रुग्णांना एकत्रित आणून त्यांचे लग्न जुळविण्याकरिता उथ्थान फाउंडेशनने शनिवारी खांदा वसाहतीत यांच्याकरिता वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते.या अनोख्या उपक्रमातदेशभरातून साडेतीनशे जण सहभागी झाले होते.एचआयव्हीची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये तरुणांचा आकडाही मोठा आहे. तारुण्यातच या आजाराने ग्रासले असल्याने त्यांच्या मनात वैफल्य निर्माण होते. त्याचबरोबर समाजात चांगली वागणूक मिळत नाही. त्याशिवाय कुटुंबीयांकडूनही अनेकदा आधार भेटत नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात कमालीचे नैराश्य येते. औषधोपचारामुळे पुढील बरीच वर्षे जगता येणे शक्य नसते, एकटे पडल्यामुळे एचआयव्ही बाधित रुग्ण मानसिकदृष्ट्या खचतात. अशांकरिता मुंबई येथील पीपल्स हेल्थ केअर फाउंडेशन गेल्या काही वर्षांपासून काम करीत आहे. संबंधितांना आधार देऊन त्यांच्या मनात जगण्याची आशा निर्माण करण्याचे काम ही संस्था करीत आहे. पीपल्स हेल्थ केअरशी सलग्न असलेल्या उथ्थान फाउंडेशनने एचआयव्ही पॉझिटिव्ह असणाºयांकरिता खास वधूवर परिचय मेळाव्याचे खांदा वसाहतीत आयोजन केले होते. याबाबत एक महिनाअगोदरपासूनच नोंदणी सुरू होती. एचआयव्हीच्या औषधोपचार केंद्रावर याविषयी माहिती देण्यात आली होती. त्यानुसार हरियाणा, राजकोट, पंजाब, दिल्ली, गोवा, मध्यप्रदेश, तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून वधू आणि वर पनवेलमध्ये दाखल झाले होते. सहभागी झालेले १८ ते ३२ या वयोगटामधील होते. त्यांचे तीन गट तयार करून आयोजकांनी परस्परांबरोबर संवाद साधण्याची व्यवस्था करून दिली. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनय कांबळे यांनी याकरिता पुढाकार घेतला होता. जनसेवा आश्रम सभागृहात पार पडलेल्या या अनोख्या मेळाव्याला युवा सेनेचे रायगड जिल्हा सचिवरूपेश पाटील, शिवसेनेचे विधानसभा संघटक दीपक निकम आदीउपस्थित होते.
एचआयव्ही बाधितांना मिळाला आशेचा नवा किरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 4:27 AM