- जमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांबाबत ‘मॅट’ने आक्षेप घेतल्यानंतर त्या रद्द करण्यात आल्या. मात्र, त्यानंतर पोलिस मुख्यालयात तातडीने आस्थापन मंडळ क्रमांक -२ ची बैठक घेऊन तांत्रिक चूक दुरुस्त करण्यात आली. या मंडळाला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करीत पोलिस ‘मिड टर्म’ बदली म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
या मान्यतेमुळे ९ डिसेंबर रोजी जारी केलेल्या बदल्यांची व नवनियुक्तीची ठिकाणे तशीच राहणार आहेत. संबंधितांना तातडीने कार्यमुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याआधी महाराष्ट्र पोलिस दलातील २२५ पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश सात दिवसांत रद्द करण्यात आले होते. महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाने (मॅट) याबाबत दाखल प्रकरणी झालेल्या सुनावणीत आदेश मागे घेत असल्याचे सरकारी पक्षाने जाहीर केले होते. ९ डिसेंबरला २२५ निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी झाले होते.
मुंबई, ठाणे, पुणे या जिल्ह्यांतील सुमारे १२५ वर अधिकाऱ्यांचा यात समावेश होता. या आदेशाला सोलापुरातील निरीक्षक प्रदीप काळे यांनी ‘मॅट’मध्ये आव्हान दिले होते. राज्य सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या ३१ मेपर्यंत करावयाच्या असतात. मात्र, यावर्षी त्या विविध कारणास्तव रखडल्या होत्या. ९ डिसेंबरला राज्यातील २२५ निरीक्षकांचे आदेश जारी करून संबंधितांना त्वरित बदलीच्या जागी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांनी दिले होते.
मध्यावरच बदल्या झाल्याने पाल्यांचे शिक्षण, कौटुंबिक अडचणी उद्भवत असल्याचा आक्षेप घेत काळे यांनी ‘मॅट’मध्ये धाव घेतली होती.