जुन्याच कामांची नव्याने डागडुजी; माथेरानमध्ये बिले काढण्यासाठी खटाटोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 11:15 PM2020-10-10T23:15:41+5:302020-10-10T23:15:46+5:30

ठेकेदाराचा प्रताप, मुदतवाढ देऊनही कामे अपूर्णच

New repairs to old works; In Matheran, it is difficult to get bills | जुन्याच कामांची नव्याने डागडुजी; माथेरानमध्ये बिले काढण्यासाठी खटाटोप

जुन्याच कामांची नव्याने डागडुजी; माथेरानमध्ये बिले काढण्यासाठी खटाटोप

Next

माथेरान : विविध शासकीय निधीतून विकासकामे सुरू असताना जी अत्यावश्यक महत्त्वाची कामे पूर्ण करावयाची आहेत ती बाजूला सारून जुन्या कामांची नव्याने डागडुजी केली जात असल्याने केवळ आपली बिले काढण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेरिटेज वास्तू असलेल्या माथेरानमधील मध्यवर्ती भागात असलेल्या कापडिया मार्केटच्या नूतनीकरणासाठी जवळपास पाऊण कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये मटण मार्केट सुशोभीकरण त्याचप्रमाणे अंतर्गत कामे पूर्ण करण्यासाठी खर्च केला जाणार आहे; परंतु मटण मार्केट, गिरणी दुकाने यांची पूर्णत: दुरुस्तीची कामे अन्य दुकानांच्या रेस्टॉरंटच्या सांडपाण्याचा निचरा करणेसाठी पाइपलाइन बसविणे ही कामे या मोठ्या रकमेच्या खर्चातून पूर्ण करायची आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना अनेकदा मुदतवाढसुद्धा देण्यात आली आहे. परंतु ही कामे आजही कासवगतीने सुरू आहेत. याच मार्केटमधील कठड्यावर रविवारच्या बाजाराला भाजीविक्रेते व अन्य व्यावसायिक आपला व्यवसाय करीत असतात. हा कठडा मागील तीन ते चार वर्षांपूर्वी नगर परिषदेमार्फत बनविण्यात आला होता. त्या मजबूत कठड्याचा वरील भाग तोडून पुन्हा नव्याने काम सुरू केले आहे. हा कठडा तोडण्याची काहीही आवश्यकता नसताना हे काम कुणा एखाद्या व्यक्तीच्या सांगण्यावरून मर्जीनुसार केले जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच अशा दुबार कामांबाबत आश्चर्य व्यक्त होते आहे.

नगर परिषदेचे दुर्लक्ष
या तोडण्यात आलेल्या कठड्यातील दगडमाती त्याच कामासाठी वापरली जात आहे. हा सुरू असलेला सर्व खेळ वाढीव कामे दाखवून ठेकेदारांची बिले काढण्यासाठी असून, याकडे नगर परिषदेचे अभियंते तसेच कार्यतत्पर लोकप्रतिनिधी आणि नगर परिषद प्रशासन हेतुपुरस्सर कानाडोळा करीत असल्याने या गावात सध्यातरी काय चाललंय, विकासकामे होत आहेत की केवळ ठेकेदारांच्या आणि मर्जीतल्या लोकांना कामे देऊन त्यांच्या फायद्यासाठी संबंधित ठेकेदारांना सातत्याने मुदतवाढ दिली जात आहे, असे नागरिक बोलत आहेत.

Web Title: New repairs to old works; In Matheran, it is difficult to get bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.