शाळेला मिळाले नवीन पत्र्यांचे शेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 11:57 PM2019-07-18T23:57:59+5:302019-07-18T23:58:09+5:30
‘लोकमत’ने ३ जुलैच्या अंकात ‘भर पावसात विद्यार्थी गिरवितात शिक्षणाचे धडे’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते.
मोहोपाडा : ‘लोकमत’ने ३ जुलैच्या अंकात ‘भर पावसात विद्यार्थी गिरवितात शिक्षणाचे धडे’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले असून झोपलेली शासकीय यंत्रणा जागी झाली. या शाळेत पावसात भिजून धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांनंतर शालेय खोल्यांना नवीन पत्र्याची शेड मिळाल्याने शालेय समितीसह पालक, विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.
मोरबे येथील जिल्हा परिषदेच्या पहिली ते पाचवीपर्यंतच्या प्राथमिक शाळेतील पत्रे फुटल्याने गेली दोन वर्षे विद्यार्थी पाण्यात भिजून शिक्षण घेत होते, याकरिता शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा अरुणा नरेश राणे यांनी १९ जुलै २०१८ रोजी खालापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी व तालुका शिक्षण अधिकारी यांच्याकडे अर्ज करूनही दुर्लक्ष करत होते. शिवाय, मोरबे ग्रामस्थांकडून २८ फेब्रुवारी २०१९ रोजी चौक ग्रामपंचायतीकडे लेखी पत्रव्यवहार करण्यात आला होता; परंतु संबंधितांकडून वेळकाढूपणा झाल्याने विद्यार्थ्यांना भिजत अभ्यास करावा लागत होता, ही हकिकत पालकांनी सांगितली. या वेळी ‘लोकमत’ने मोरबे शाळेतील विद्यार्थ्यांची परिस्थिती, येथील विविध समस्यांना वृत्ताद्वारे समोर आणले. यानंतर शासकीय यंत्रणा जागी झाली. वृत्त प्रसिद्ध होताच शासकीय कर्मचाऱ्यांनी शाळेची पाहणी करून दोन्ही वर्गखोल्यांना २० नवीन पत्रे लावून गळती बंद केली. शाळेतील वर्गखोल्यांना नवीन पत्रे मिळाल्याने शिक्षण समितीच्या अध्यक्षा अरुणा राणे, शिक्षक व पालकांनी ‘लोकमत’चे आभार मानले.