- सिकंदर अनवारेदासगाव - महाड तालुक्यात शासकीय इमारती वारेमाप बांधल्या जात आहेत. नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाकडून दिली जाणारी चुकीची माहिती यामुळे जनतेचा पैसा या इमारतींवर चुकीच्या पद्धतीने वाया घालवला जात आहे. महाडमध्ये कोळोसे येथे नव्याने बांधण्यात आलेले धान्य गोदाम बांधकाम पूर्ण होऊन वर्ष झाले तरी अद्याप सुरू झालेले नाही. शासनाने एकीकडे पुरवठा विभागाकडून देण्यात येणारे धान्य जवळपास बंद केले आहे असे असताना पुन्हा नव्या गोदामाची गरज कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या महाडमध्ये तीन धान्य गोदामे आहेत. त्यांची एकूण धान्य साठवण क्षमता १२५० मेट्रिक टन आहे तर नव्याने बांधण्यात आलेले गोदाम १०८० मेट्रिक टन क्षमतेचे आहे. तालुक्यात सध्या केवळ ३०० मेट्रिक टन धान्य उपलब्ध होते.शासकीय इमारती बांधताना त्या त्या ठिकाणी असलेल्या गरजेचा विचार केला जात नाही. जिल्हा परिषदेमार्फत आणि शासनाकडून विविध योजनांतून महाड तालुक्यात अनेक इमारती बांधण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेने तर आरोग्य उपकेंद्रांवर कोट्यवधी रुपये खर्ची घातले आहेत. अशाच प्रकारे चुकीचे नियोजन करत जनतेचा पैसा वाया घालवण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. कोळोसे या ठिकाणी शासनाने नवे धान्य गोदाम बांधले आहे. आधीच महाड तालुक्यात जवळपास तीन धान्य गोदामे आहेत. ही गोदामे सद्यस्थितीत पुरेशी असताना केवळ योजना राबवायची म्हणून हे नवे गोदाम बांधण्यात आले आहे. नाबार्डमधून या गोदामाची निर्मिती झाली असून जवळपास दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कोळोसे गावातील शासकीय जागेवर ही इमारत बांधली असली तरी रस्त्याचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. या गोदामाकडे जाण्याकरिता अरुंद रस्ता आहे तो देखील खासगी मालकीचा आहे. यामुळे महाड पुरवठा विभागाने त्रुटी दाखवत हे गोदाम ताब्यात घेण्यास सुरवातीला नकार दिला. मात्र, आता हे गोदाम पुरवठा विभागाने विनातक्रार ताब्यात घेतले आहे. हे गोदाम ताब्यात घेतल्यापासून अद्याप उद्घाटन झालेले नाहीच, शिवाय याचा वापरदेखील सुरू झालेला नाही. यामुळे गोदाम धूळखात पडले असून इमारतीच्या काचा तुटून पडल्या आहेत. विजेचे दिवेदेखील फुटले आहेत.तीन गोदामांची क्षमता १२५० मेट्रिक टनमहाड तालुक्यात यापूर्वी मोठ्या प्रमाणात धान्य येत होते. शासनाच्या पुरवठा विभागाकडून या धान्याचा पुरवठा होत होता. आलेले धान्य योग्य प्रकारे साठवून ठेवण्याकरिता महाड शहर, बिरवाडी, या ठिकाणी एकूण तीन गोदामे आहेत. महाड शहरात नवेनगरमध्ये असलेल्या गोदामात ५०० मेट्रिक टन धान्य साठवण क्षमता आहे तर बिरवाडी येथील गोदामात २५० मेट्रिक टन धान्य साठवण करता येते.महाडमधील एस.टी. स्थानकाजवळील धान्य गोदामात सध्या प्रांत कार्यालय सुरू करण्यात आले आहे. अर्ध्या भागात प्रांत कार्यालय तर अर्धा भाग रिक्तच आहे. याची धान्य साठवण क्षमता देखील ५०० मेट्रिक टन आहे. तीनही गोदामाची एकूण क्षमता १२५० मेट्रिक टन इतकी आहे. सध्या महाड तालुक्यात केवळ ३०० मेट्रिक टन धान्य शासनाकडून उपलब्ध होते असे असताना पुन्हा १०८० मेट्रिक टन धान्य गोदाम इमारत कोणासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.शासनाकडून आता केवळ अंत्योदय आणि बी.पी.एल. रेशनकार्डधारकांसाठीच धान्यपुरवठा केला जातो. यामध्ये देखील तांदूळ आणि गहू या दोनच धान्यांचा समावेश आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या तीनही गोदामांची क्षमता आता येत असलेल्या धान्यापेक्षा अधिक आहे.
महाडमधील नवे गोदाम धूळखात पडून, तालुक्यात केवळ ३०० मेट्रिक टन धान्य उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 3:35 AM