इर्शाळवाडी दरडग्रस्तांना नवीन वर्षाची भेट, ३ गुंठे जमिनीवर घर; मे २०२४ पर्यंत गाव वसणार
By राजेश भोस्तेकर | Published: January 1, 2024 02:11 PM2024-01-01T14:11:50+5:302024-01-01T14:12:18+5:30
सिडकोद्वारे ४४ घरे उभारण्याचे काम युद्धपातळीवर...
अलिबाग : खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीतील दरडग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या कामाला आता वेग आला आहे. चौकमधील मानिवली येथे अडीच हेक्टर जागेत ४४ घरे बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. आपद्ग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी तीन गुंठे जागेवर सिडकोच्या माध्यमातून ही घरे बांधून दिली जाणार आहेत.
यासाठी प्री कास्ट तंत्रज्ञान वापरले जात असल्याने हे काम कमी वेळात होणार आहे. त्यामुळे नववर्षात इर्शाळवाडी गाव हे मे अखेरपर्यंत वसले जाणार आहे. गावात शाळा, समाजमंदिर, खेळाचे मैदान या सुविधाही पुरवल्या जाणार आहेत. अंतर्गत रस्ते, पाणी आणि वीज आदी सुविधाही पुरवण्यात येणार आहेत.
चौक मानिवलीत २.६० हेक्टर जागा
खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी या आदिवासीवाडीवर १९ जुलैच्या रात्री दरड कोसळली. या दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला तर ८४ जणांचा शोध लागला नसल्याने त्यांना शासनाने मृत घोषित केले आहे. तेथील परिस्थिती पाहता या कुटुंबांचे स्थलांतर करणे गरजेचे होते. युती सरकारने इर्शाळवाडीचे पुनर्वसन करण्यासाठी तातडीने पावले उचलली गेल्याने नववर्षाच्या मध्यान्ह्यात बाधित दरडग्रस्त हे आपल्या नव्या घरात प्रवेश करणार आहेत.
इथं पाच एकर जागेमध्ये ४४ घरे उभारली जात आहेत. हॉल, किचन, बेडरूम, स्वच्छतागृह आणि मोकळी जागा अशी घरांची रचना असेल. घरे काँक्रिटची असतील. छप्पर स्लॅबचे असेल. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी स्वतंत्र नाला असेल, ज्यामुळे घरांना धोका होणार नाही. याशिवाय इतर नागरी सुविधांचादेखील यात समावेश आहे. सहा महिन्यांत या घरांचे काम पूर्ण होईल.
- उत्तम नागटिळक, प्रकल्प व्यवस्थापक
काय आहे प्री कास्ट?
प्री कास्ट तंत्रज्ञान म्हणजे कमी वेळात अधिक काम. घर तयार करण्यापूर्वी त्याची संकल्पना तयार केली जाते. त्यानुसार घराचे वेगवेगळे भाग काँक्रीटमध्ये तयार केले जातात आणि ते जोडून घर उभे राहते.