वाहन न मिळाल्याने नवजात बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 03:00 AM2018-04-20T03:00:50+5:302018-04-20T03:00:50+5:30
थोड्या अंतरावर चालल्यानंतर कल्पनाला वेदना असह्य झाल्या व ती रस्त्यात कोसळली. तिथेच तिची प्रसूती झाली व बाळ दगावले.
संजय गायकवाड।
कर्जत : गरोदर महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी वाहन न मिळाल्याने ती रस्त्यातच प्रसूत होऊन बाळ दगावल्याची घटना बुधवारी घडली.
कर्जतमधील वर्णे ठाकूरवाडी येथे कल्पना बांगरे ही बाळंतपणासाठी ६ एप्रिल रोजी माहेरी आली होती. ती सात महिन्यांची गरोदर होती. बुधवारी पोटात दुखू लागल्याने दवाखान्यात जाण्याचा निर्णय घेतला. वाडीवर कोणाकडे चारचाकी नसल्याने कल्पनाचे आईवडील, बहीण, भाऊ, शेजारचे दोन व्यक्ती असे सर्व पायी चालत निघाले. थोड्या अंतरावर चालल्यानंतर कल्पनाला वेदना असह्य झाल्या व ती रस्त्यात कोसळली. तिथेच तिची प्रसूती झाली व बाळ दगावले.
वर्णेवाडीत जाण्यासाठी पक्का रस्ता असता, वेळीच वाहन उपलब्ध झाले असते तर बाळ दगावले नसते, असा आरोप कल्पनाचे मामा महादू उगडा यांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळताच गुरुवारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे आणि दिशा केंद्राचे अशोक मोरे यांनी वाडीवर भेट दिली. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून आशा सेविका एकदाही वाडीवर आल्या नाहीत. तर अंगणवाडी सेविकांना रु गवाहिका मिळवण्यासाठी १०८ व १०२ क्रमांक असतो, हेच माहीत नसल्याचे उघडकीस आले. कल्पनाचे सासर तळेगाव ता. मावळ, येथील भिंडेवाडी येथे आहे. सासरी आणि माहेरी गरोदरपणाची नोंदणी केली नसल्याचे समोर येत आहे. बाळाच्या मृत्यूस आरोग्य विभाग व बांधकाम विभाग जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.