अलिबाग : रायगड जिल्हाधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेले किशन जावळे यांनी गुरुवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी बुधवारीच पद सोडून पदभार नवनिर्वाचित जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे दिला. गुरुवारी सकाळी जावळे यांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आपला पदभार स्वीकारला. यावेळी अधिकारी वर्गाने त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, अलिबाग प्रांताधिकारी मुकेश चव्हाण, अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यासह विविध विभागाचे अधिकारी यावेळी स्वागताला उपस्थित होते.
मावळते जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांची तेरा महिन्यात बदली झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय सेवेतील अधिकारी याच्या बदल्या सत्र सुरू आहे. यामध्ये जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांची बदली शासनाने केली असून त्याच्या जागी कोकण अपर आयुक्त किशन जावळे यांची नियुक्ती केली आहे. गुरुवारी जावळे यांनी रायगड जिल्हाधिकारी म्हणून आपला पदभार स्वीकारला आहे.
नवनिर्वाचित जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासकीय अधिकारी यांच्याशी जिल्ह्यातील विकास कामे आणि प्रश्नाबाबत माहिती करून घेतली. जिल्ह्यातील रखडलेले प्रश्न नवनिर्वाचित आलेले जिल्हाधिकारी कशा पद्धतीने सोडविणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.