पुढील वर्षी रायगडचे नवे आणि प्रसन्न रूप पाहायला मिळेल - संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:33 AM2018-06-07T01:33:27+5:302018-06-07T01:33:27+5:30

रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पुढील वर्षी गडावरील फसरबंदी, ८४ तलावांची सफाई, तटबंदीची दुरुस्ती आदी कामे पूर्ण झालेली असतील. रायगडचे एक नवे आणि प्रसन्न रूप शिवभक्तांना पाहावयास मिळेल, असा विश्वास खा. संभाजीराजे यांनी व्यक्त केला.

 Next year, you will find a new and delightful form of Raigad - SambhajiRaje | पुढील वर्षी रायगडचे नवे आणि प्रसन्न रूप पाहायला मिळेल - संभाजीराजे

पुढील वर्षी रायगडचे नवे आणि प्रसन्न रूप पाहायला मिळेल - संभाजीराजे

googlenewsNext

- संदीप जाधव

महाड : रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पुढील वर्षी गडावरील फसरबंदी, ८४ तलावांची सफाई, तटबंदीची दुरुस्ती आदी कामे पूर्ण झालेली असतील. रायगडचे एक नवे आणि प्रसन्न रूप शिवभक्तांना पाहावयास मिळेल, असा विश्वास खा. संभाजीराजे यांनी व्यक्त केला. बुधवारी किल्ले रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
खा. युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे, राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, फिजीचे राजदूत रोंढीरकुमार, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद छत्रे, शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, पानिपत येथील रोड मराठा समाजाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
मंगळवारी गडपूजनाने शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. खा. संभाजीराजे छत्रपती आणि युवराज शहाजीराजे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून त्याचप्रमाणे मेघडंबरीतील शिवपुतळ्यावर सुवर्ण मोहोरांचा अभिषेक करून राज्याभिषेक साजरा करण्यात आला. त्यानंतर मेघडंबरी ते शिवसमाधीपर्यंत भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली. शिवकालीन वेशामध्ये उपस्थित असलेले, भगवा ध्वज हाती घेऊन शिवरायांचा जयघोष करणारे शिवभक्त रायगडावर शिवकालच अवतरल्याची प्रचिती देत होते.
आठ दिवसांपासूनच संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीचे कार्यकर्ते या सोहळ्याची तयारी करीत होते. यावेळी गडावरील उत्खननामध्ये सापडलेल्या विविध शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. वाहतूककोंडी होऊ नये यासाठी पाचाड नाक्यावरच चारचाकी वाहने थांबण्यात येत होती. त्यामुळे शिवभक्तांना पाचाड नाका ते चित्तदरवाजापर्यंत चार किमी पायपीट करावी लागली.

Web Title:  Next year, you will find a new and delightful form of Raigad - SambhajiRaje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड