जिल्ह्यातील नऊ धरणे ओव्हरफ्लो,पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 05:00 AM2018-07-04T05:00:59+5:302018-07-04T05:01:13+5:30
कुलाबा वेधशाळेने दिलेल्या अनुमानानुसार ४ ते ६ जुलै अशा येत्या तीन दिवसांकरिता अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेली संततधार मंगळवारीही कायम होती.
- जयंत धुळप
अलिबाग : कुलाबा वेधशाळेने दिलेल्या अनुमानानुसार ४ ते ६ जुलै अशा येत्या तीन दिवसांकरिता अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेली संततधार मंगळवारीही कायम होती. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत वाढ झाली. या पार्श्वभूमीवर किनारी भागांतील गावांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, तर १२ ते १७ जुलै दरम्यान समुद्रास ४.५० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाटबंधारे विभागाच्या एकूण २८ धरणांपैकी नऊ धरणे भरून वाहू लागली आहेत. या नऊ धरणांमध्ये मुरुड तालुक्यातील फणसाड (१०० टक्के), रोहा तालुक्यातील सुतारवाडी (१०० टक्के), सुधागड तालुक्यातील कवेळे (१०६ टक्के), उन्हेरे (११० टक्के), म्हसळा तालुक्यातील पाभरे (१०० टक्के), संदेरी (१०० टक्के), महाड तालुक्यातील खिंडवाडी (१०१ टक्के), खैरे (१०७ टक्के) आणि खालापूर तालुक्यातील भिलवले(१०० टक्के) या धरणांचा समावेश आहे.
उर्वरित धरणांमध्ये तळा तालुक्यातील वावा (७२ टक्के), पेण तालुक्यातील आंबेघर (१९ टक्के), अलिबाग तालुक्यातील श्रीगाव (१० टक्के), सुधागड तालुक्यातील कोंडगाव (८२ टक्के), घोटवडे (५६ टक्के), ढोकशेत (४८ टक्के), श्रीवर्धन तालुक्यात कार्ले (४३ टक्के), कुडकी (७८ टक्के), रानिवली (२१ टक्के), महाड तालुक्यात वरंध (९२ टक्के), कोथुर्डे (९७ टक्के), कर्जत तालुक्यात साळोख (२० टक्के), अवसरे (४७ टक्के), खालापूर तालुक्यातील कलोते-मोकाशी (७३ टक्के), डोणवत (५० टक्के), पनवेल तालुक्यातील मोर्बे (८६ टक्के), बामणोली (४२ टक्के), उसरण (७९ टक्के), उरण तालुक्यातील पुनाडे (४१ टक्के) या धरणांच्या जलपातळीतही वाढ होत आहे.
संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीतही वाढ झाली आहे. पाटबंधारे विभागाने मंगळवारच्या नोंदीनुसार, रोहा तालुक्यातील पूरधोका पातळी २३.९५ मीटर असणाऱ्या कुंडलिका नदीची डोळवहाळ येथे प्रत्यक्ष जलपातळी २२.२० मीटर, रोहा तालुक्यातील पूरधोका पातळी नऊ मीटर असणाºया अंबा नदीची नागोठणे येथे प्रत्यक्ष जलपातळी ४.१५ मीटर, महाड तालुक्यातील पूरधोका पातळी ६.५० मीटर असणाºया सावित्री नदीची महाड येथे प्रत्यक्ष जलपातळी ३.३० मीटर, खालापूरमध्ये पूरधोका पातळी २१.५२ मीटर असणाºया पाताळगंगा नदीची लोहप येथे प्रत्यक्ष जलपातळी १८.३० मीटर, कर्जतमध्ये पूरधोका पातळी ४८.७७ मीटर असणाºया उल्हास नदीची कर्जत येथे प्रत्यक्ष जलपातळी ४३.८० मीटर, तर पनवेलमध्ये पूरधोका पातळी ६.५५ मीटर असणाºया गाढी नदीची पनवेल येथे प्रत्यक्ष जलपातळी २.७० मीटर निष्पन्न झाली आहे.
१२ ते १७ जुलै दरम्यान संभाव्य लाटांचा तपशील
अ.क्र. वार दिनांक वेळ संभाव्य उंची
१. गुरु वार १२ जुलै २०१८ सकाळी ११.२७ वा. ४.६५ मीटर
२. शुक्र वार १३ जुलै २०१८ दुपारी १२.१३ वा. ४.८५ मीटर
३. शनिवार १४ जुलै २०१८ दुपारी ०१.०२वा. ४.९६ मीटर
४. रविवार १५ जुलै २०१८ दुपारी ०१.४९ वा. ४.९७ मीटर
५. सोमवार १६ जुलै २०१८ दुपारी ०२.३७ वा. ४.८९ मीटर
६. मंगळवार १७ जुलै २०१८ दुपारी ०३.२५ वा. ४.७० मीटर