खोपोली : आडोशी धबधब्यावर आलेले पिंपरी-चिंचवड येथील नऊ जण रविवारी सायंकाळी धबधब्याच्या वरच्या भागात जंगल परिसरात अडकले होते. खोपोली पोलिसांनी स्थानिक आदिवासी तरुणांच्या मदतीने मानवी साखळी करून या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढले. खोपोलीजवळील आडोशी धबधब्यावर रविवार असल्याने मोठ्या संख्येत पर्यटक दाखल झाले होते. त्यातील पिंपरी-चिंचवड येथील एक कुटुंब धबधबा परिसरातील डोंगरमाथ्यावर पर्यटनाचा आनंद घेत होते. संध्याकाळी ५ वाजता मुसळधार पावसामुळे अचानक तेथील पाण्याचा प्रवाह वाढल्याने हे कुटुंब वरच्या भागात अडकले. हुश्शनबी इनामदार, जुलेरेम हुसेन बागवान, बिस्मिल्ला इनामदार, नियाज मुल्ला, फातिमा इनामदार, मुस्कान सय्यद, रज्जाक इनामदार अशी त्यांची नावे आहेत. यांच्या सोबत दोन लहान मुलेही होती.सर्वत्र दाट जंगल, अंधार आणि दाट धुके असल्याने तसेच मोबाइलला रेंज नसल्याने त्यांचा कोणीशीही संपर्क होत नव्हता. दरम्यान, या ठिकाणी गस्तीवर असलेल्या खोपोली पोलिसांच्या पथकाला डोंगरावर कोणीतरी असल्याचे दिसले. मुसळधार पाऊस व प्रचंड पाणी प्रवाह असल्याने तेथे जाणे अवघड होते. अशा स्थितीत पोलीस उपनिरीक्षक राजवर्धन खेबुर्डे यांनी स्थानिक आदिवासी तरु णांना बोलावून मानवी साखळी तयार केली. या अडकलेल्या कुटुंबापर्यंत पोलीस पोहोचले व त्यांनी कुटुंबाला सुखरूप बाहेर काढले. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक राजवर्धन खेबुर्डे यांच्यासोबत पोलीस कर्मचारी मुजावर, घोले, खराडे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
खोपोलीच्या जंगलात अडकलेले नऊ जण सुखरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 4:44 AM