अलिबाग तालुक्यात शेकापचे नऊ सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:50 AM2018-05-29T01:50:33+5:302018-05-29T01:50:33+5:30
तालुक्यातील १५ पैकी ९ ग्रामपंचायतींवर शेकापचे सरपंच निवडून आले असले तरी तेथे त्यांना पाच ग्रामपंचायतींवर बहुमत राखता आलेले नाही.
अलिबाग : तालुक्यातील १५ पैकी ९ ग्रामपंचायतींवर शेकापचे सरपंच निवडून आले असले तरी तेथे त्यांना पाच ग्रामपंचायतींवर बहुमत राखता आलेले नाही. शेकापने सहा ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. काँग्रेसने आवास आणि खानाव ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता काबीज केली आहे, तर शिवसेना आणि भाजपाचा प्रत्येकी एक सरपंच निवडून आला आहे. निकाल लागल्यानंतर तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकच विजयी जल्लोष केला.
२७ मे रोजी अलिबाग तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रि या पार पडली होती. निकाल सोमवारी जाहीर होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा होता.
१५ ग्रामपंचायतींमध्ये १५८ जागांसाठी मतदान झाले होते. त्यामध्ये सर्वाधिक काँग्रेस, शिवसेना, भाजपा आघाडीचे ८२ उमेदवार निवडून आले तर, शेकापचे ७६ उमेदवार निवडून आले आहेत.
किहीम ग्रामपंचायतीमध्ये ११ पैकी आठ उमेदवार आघाडीचे, तर तीन उमेदवार शेकापचे निवडून आले. येथे सरपंचपदी शेकापचा उमेदवार निवडून आला आहे. माणकुले ग्रामपंचायतीमध्ये ९ पैकी चार उमेदवार शेकापचे, तर पाच आघाडीचे निवडून आले आहेत. येथे भाजपाचा सरपंच निवडून आला आहे. आवास ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे ११ पैकी ११ उमेदवार निवडून आले आहेत. मिळकतखार ग्रामपंचायतीमध्ये पाच उमेदवार आघाडीचे, तर दोन शेकापचे निवडून आले. सरपंच मात्र शेकापचा बसणार आहे. कामार्लेमध्ये सहा आघाडीचे आणि तीन शेकापचे उमेदवार निवडून आले आहेत. येथे सरपंच शिवसेनेचा राहणार आहे. वाडगाव ग्रामपंचायतीत सातपैकी आघाडीचा एक उमेदवार जनतेने निवडून दिला. खिडकीमध्ये सातपैकी दोन उमेदवार शेकापचे उर्वरित आघाडीचे निवडले गेले आहेत. सरपंच मात्र काँग्रेसचा निवडून आला आहे.
रेवदंडा ग्रामपंचायतीत आघाडीचे ११ तर शेकापचे सहा उमेदवार निवडून आले आहेत, तर शेकापचा सरपंच विजयी झाला आहे. खानाव ग्रामपंचायतीत १३ पैकी १३ उमेदवार निवडून आणून काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व अबाधित राखले आहे.
पेढांबे, वाघ्रण, शहाबाज, नागाव, खंडाळे आणि चिंचवली या सहा ग्रामपंचायतींवर शेकापने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पेढांबेमध्ये आघाडीचा एकच उमेदवार निवडून आला आहे, तर नागावमध्ये आघाडीचे चार, खंडाळेमध्ये एक आणि चिंचवलीमध्ये तीन उमेदवार निवडून आले आहेत.
शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना एकत्र लढली. त्यामुळे त्यांना अपेक्षित यश संपादन करता आले आहे. त्यामुळे आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. शेकापने ९ ठिकाणी सरपंच निवडून आणून आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. निकालानंतर विविध राजकीय पक्षांनी विजयी मिरवणुका काढल्या होत्या.