नव्वद वर्षांच्या आजीची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 11:27 PM2020-09-24T23:27:47+5:302020-09-24T23:28:11+5:30
ग्रामीण रुग्णालयातच उपचार : घाबरून न जाता इच्छाशक्ती ठेवण्याचा दिला सल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : कशेळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जयराम हरपुडे यांच्या मातोश्री अनूबाई विष्णू हरपुडे या नव्वद वर्षांच्या आजीबार्इंनी कोरोनावर मात करून एक वेगळाच आदर्श ठेवला. विशेष म्हणजे कुठेही मुंबई - पुण्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये न जाता गावातीलच ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन त्या आठवडाभराने घरी आल्या.
हरपुडे आजींना मागील आठवड्यात बरे वाटत नव्हते. १२ सप्टेंबर रोजी त्यांना खोकल्यासह ताप आल्याने ग्रामीण रुग्णालय कशेळे येथे दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांना कोरोनाची लक्षणे असल्याचा संशय आल्याने त्यांची अँटिजन टेस्ट केली. टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना होम क्वारंटाइन केले; परंतु दोन दिवासांनी त्यांना श्वसनाचा त्रास होऊन अस्वस्थ वाटू लागल्याने पुन्हा ग्रामीण रुग्णालय कशेळे येथे दाखल केले. तेथील डॉक्टर विक्रांत खंदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू झाले. त्यांची आॅक्सिजन लेवल कमी-जास्त होत होती. मला बाहेर पुण्या - मुंबईला कुठे नेऊ नका, असा त्यांचा आग्रह होता. डॉक्टरांचे प्रयत्न आणि हरपुडे आजींची दुर्दम्य इच्छाशक्ती यामुळे अनूबाई यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली.
कशेळे गावातील सर्वांत वयोवृद्ध असणाऱ्या सर्वांच्या आजींनी या वयातही कोरोनावर मात करून घरी आल्याने गावातील लोकांना कोरोनावर धैर्याने सामोरे जाण्याचे बळ मिळाले. कोरोना म्हणजे मृत्यू ही भीती कमी झाली. बुधवारी त्यांना घरी आणल्यानंतर त्यांच्या नातवंडांनी आरती ओवाळून त्यांचे स्वागत केले. कर्जत पंचायत समिती सदस्या सुरेखा अरुण हरपुडे यांच्या त्या आजे सासू आहेत.
कोरोना या रोगाची भीती मनात झाली तर माणूस घाबरतो. कोरोना झाला आहे हे लपवून ठेवण्यापेक्षा लगेचच दवाखान्यात जाऊन औषधे घेतली की आजारी माणूस बरा होतो. पण माणसाची इच्छाशक्ती पाहिजे.
- अनूबाई हरपुडे,
कशेळे, कर्जत