‘निर्मल ग्राम’ पुरस्कार रखडला
By admin | Published: July 8, 2015 10:49 PM2015-07-08T22:49:15+5:302015-07-08T22:49:15+5:30
जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायती निर्मल ग्राम पुरस्कारासाठी पात्र आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांपासून केंद्रीय स्तरावरील पथक परीक्षणासाठी जिल्ह्यात फिरकलेच नाही
आविष्कार देसाई अलिबाग
जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायती निर्मल ग्राम पुरस्कारासाठी पात्र आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांपासून केंद्रीय स्तरावरील पथक परीक्षणासाठी जिल्ह्यात फिरकलेच नाही. त्याचप्रमाणे २०१३ साली १६ ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार जाहीर होऊनही राष्ट्रपती अथवा राज्यपालांच्या हस्ते होणारा पुरस्कार वितरण समारंभही रखडला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये तीव्र नाराजी आहे.
जिल्हा हगणदारीमुक्तीकडे वाटचाल करीत असतानाच दुसरीकडे सरकारकडूनच स्वच्छ भारत मिशनच्या कार्यक्रमाला ब्रेक लावला जात असल्याचे त्यानिमित्ताने समोर आले आहे. रायगड जिल्हा स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून चांगले काम करीत आहेत. वैयक्तिक शौचालये उभारण्याचे ६५ टक्के उद्दिष्ट रायगड जिल्ह्याने गाठले आहे. जिल्ह्यात एकूण ८२४ ग्रामपंचायती आहेत. २००४-०५ ते २०१०-११ सालापर्यंत ४५५ ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे, तर १६ ग्रामपंचायतींना पुरस्कार जाहीर झाला असून त्या ग्रामपंचायती अद्यापही पुरस्कारापासून वंचित आहेत.