नितीन देसाई आत्महत्या प्रकरण: आरोपीची नऊ तास चौकशी, पुन्हा ११ ऑगस्टला हजर राहण्याची नोटीस
By राजेश भोस्तेकर | Published: August 8, 2023 07:41 PM2023-08-08T19:41:06+5:302023-08-08T19:41:31+5:30
कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अलिबाग : नितीन देसाई आत्महत्या गुन्हयाच्या अनुषंगाने ईसीएल फायनांन्स कंपनी, एडलवाईज ग्रुप यांच्या व्यवस्थापकिय संचालक यांना नोटीस देवून विविध मुद्यांवर माहिती रायगड पोलिसांनी मागविण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी कंपनीचे व्यवस्थापक संचालक फणीद्रनाथ काकरला आणि इतर तीन पदाधिकारी खालापूर पोलीस ठाण्यात हजर झाले.
रायगड पोलिसांनी चार ही अधिकाऱ्याची नऊ तास कागदपत्राची पडताळणी करून चौकशी केली. मात्र पोलिसांनी मागितलेल्या माहिती पैकी आरोपी यांनी आणलेली माहिती अपूर्ण आणि विस्तृत स्वरूपात नसल्याने पुन्हा नोटीस बजावली आहे. आरोपींना पुन्हा सर्व मागवलेली माहिती घेऊन ११ ऑगस्ट रोजी खालापूर पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले असल्याचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी माहिती दिली आहे.
कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली होती. त्यानुसार केयुर मेहता, रशेष शहा, स्मित शहा, ईएआरसी कंपनीचे आर के बन्सल, प्रशासक जितेंद्र कोठारी यांच्यावर गुन्हा दखल झाला आहे.
रायगड पोलिसांनी ४ ऑगस्ट रोजी कंपनी पदाधिकारी याना ८ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत खालापुर पोलीस ठाणे येथे समक्ष हजर राहून सादर करण्याबाबत नोटीसद्वारे समज देण्यात आलेली होती. त्यानुसार आरोपी हे उपस्थित झाले होते. सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडे सहा पर्यंत नऊ तास चौकशी करण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय अधिकारी विक्रम पाटील, खालापूर पोलीस निरीक्षक बाळा कुंभार या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. नितीन देसाई यांचे काका श्रीकांत देसाई हे सुध्दा चौकशीला हजर होते.