रायगड - कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला असून, संबंधित आरोपी आज सकाळी १० वाजताच खालापूर पोलिस ठाण्यात पोहोचले होते. आपल्या वकिलांसोबत हे आरोपी आपला जबाब नोंदविण्यासाठी आले आहेत. एडलवाईज व ईसीएल फायनान्स कंपनीचे काही अधिकारीही सर्व कागदपत्रांसह पोलीस स्टेशनला हजर झाले आहेत. तर, नितीन देसाई यांचे काका श्रीकांत देसाई हेही यावेळी पोलीस ठाण्यात आले आहेत. सकाळी ११ वाजल्यापासून आरोपींची चौकशी सुरू करण्यात आली असून तब्बल ५ तासांपर्यंत चौकशी सुरूच होती.
नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर गुन्हा दाखल झाल्यावर खालापूर पोलिसांनी संबधित फायनान्स कंपन्याना नोटीस पाठवली होती. त्यानुसार, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आज खालापूर पोलीस स्टेशनला धाव घेतली. सकाळी अकरा वाजल्यापासून ही चौकशी सुरू आहे. खालापूर पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, खालापूर उपविभागीय अधिकारी विक्रम कदम, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्फत ही चौकशी सुरू आहे.
एन. डी. स्टुडिओचे कायदेशीर सल्लागार, आर्थिक सल्लागार व अकाऊंटंट यांच्याकडूनही सदर कर्ज प्रकरणाबाबत तपास अधिकारी माहिती घेत आहेत. तसेच गुन्ह्याच्या अनुषंगाने आतापर्यंत १५ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. नितीन देसाई यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा खालापूर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली होती. त्यानुसार केयुर मेहता, रशेष शहा, स्मित शहा, ईएआरसी कंपनीचे आर. के. बन्सल, प्रशासक जितेंद्र कोठारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. दरम्यान, कंपनीने आरोप फेटाळले आहेत.