लाेकमत न्यूज नेटवर्कमाणगाव : माणगाव तालुक्यातील निजामपूर ग्रामपंचायत हद्दीतील अबडुंगी गावालगत असणाऱ्या गुरांच्या वाड्याला गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत वाड्यात बांधलेल्या ६ म्हशीपैकी ३ म्हशींचा होरपळून मृत्यू झाला तर तीन म्हशी भाजल्याने जखमी झाल्या आहेत. निजामपूरपासून २ कि.मी. अंतरावर ही घटना घडली.या आगीत शेतकऱ्याचे ४ लाखांचे नुकसान झाले आहे. वअबडूंगी गावालगत मनोहर उतेकर यांचा गुरांचा वाडा (गोठा) असून वाड्यात ६ म्हशी बांधलेल्या होत्या. त्याचबरोबर त्यांना खाण्यासाठी भाताचा पेंडाही मोठ्या प्रमाणात साठवलेला होता. दुपारी या वाड्यात असणाऱ्या वीजवाहिनीला शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागली. त्यात वाड्यातील भाताच्या पेंड्याने पेट घेतला. त्यामुळे आग पसरून वाडा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला.
या घटनेची माहिती मिळताच शेतकरी व ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या दुर्घटनेत तीन म्हशींचा होरपळून मृत्यू झाला तर तीन म्हशी गंभीररित्या भाजल्याने जखमी झाल्या आहेत. जखमी म्हशींवर तातडीने निजामपूर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिवगुंडे यांनी उपचार केले तर वाड्याची कौले, वाशे, ढापे यांचेही प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. निजामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजा रणपिसे, माजी सरपंच बाळाराम दबडे, कोस्ते खुर्द ग्रामपंचायतीचे सदस्य गोविंद कासार यांनी घटनास्थळी भेट दिली. शेतकऱ्याला शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, निजामपूरचे तलाठी आगे यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.