- वैभव गायकर, पनवेलपनवेलकरांच्या सोयीसाठी काही दिवसांपूर्वी शहरात एनएमएमटीची बससेवा सुरू करण्यात आली. ७५ क्रमांकाच्या या बससेवेला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या पनवेल रेल्वे स्थानक ते साईनगर मार्गावर दिवसातून चार फेऱ्या होतात.पनवेल रेल्वे स्थानकापासून सकाळी ७ वाजून १८ मिनिटांनी पहिली बस सुटते तसेच शेवटची बस रात्री ८ वाजून ३६ मिनिटांनी सुटते. साईनगरमधून पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत येणारी पहिली बस सकाळी ७ वाजता सुटते तर शेवटची बस ८ वाजून ५६ मिनिटांनी सुटते. पहिल्या दिवसापासूनच या बससेवेला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला असून दिवसाला १५00 ते १६00 नागरिक या बसमधून प्रवास करीत आहेत. पहिल्या दिवशी एनएमएमटीला या बससेवेतून ७७४४ रु पयांचे उत्पन्न मिळाले होते त्यात भर होवून हे उत्पन्न १४ हजारांच्या घरात पोहचले आहे. त्यामुळे बससेवेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. गेल्या १४ दिवसात एनएमएमटीच्या उत्पन्नात १ लाखाची भर पडली आहे. या मार्गावर वातानुकूलित बससेवा सुरु करण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे. पनवेल रेल्वे स्थानक, पनवेल बसस्थानक , नवीन पनवेल उड्डाणपूल, ठाणा नाका, कफनगर, सारस्वत बँक, तालुका पोलीस स्टेशन, वाल्मीकी नगर, नगरपालिका, दर्गा नाका, लायन गार्डन, काळण समाज हॉल, प्रांत कार्यालय, गुरु पुष्प सोसायटी , साई रत्नदीप सोसायटी, साईनगर आदी मार्गावर ही बस सुरू आहे. रेल्वे प्रवाशांसाठीही ही बससेवा फायद्याची ठरत आहे.मार्गावर वातानुकूलित बससेवा सुरू करण्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे. तसेच नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सवलतीच्या दरात पासेस उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवासी करू लागले आहेत.प्रवाशांचा चांगला प्रतिसाद या बससेवेला लाभला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. पासची सुविधा याठिकाणी सुरू झाली नसली तरी भविष्यात ती देखील सुरू करण्यात येईल.- संतोष पष्टे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक , आसुडगाव आगार एनएमएमटी
एनएमएमटीचे उत्पन्न १४ दिवसांत १ लाख
By admin | Published: October 24, 2015 1:08 AM