रायगड : माघी गणेशाेत्सवानिमित्त कुलाबा किल्ल्यात येणाऱ्या भाविकांकडून प्रवेश फी आकारू नये, अशी मागणी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केली. याबाबतचे पत्र त्यांनी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांना दिले. १४ आणि १५ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत माघी गणेशोत्सव कुलाबा किल्ल्यात साजरा होणार आहे.१५ फेब्रुवारी २०२१ राेजी माघी गणेशाेत्सव राज्यात माेठ्या उत्साहात आणि जल्लाेषात साजरा करण्याची परंपरा आहे. अलिबाग येथील ऐतिहासिक कुलाबा किल्ला हा सुमारे साडेतीनशे वर्षे जुना आहे. याच कुलाबा किल्ल्यामध्ये श्री सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. तेथे माेठ्या प्रमाणात गणेशाचा जन्मदिवस म्हणजेच माघी गणेशाेत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात येताे. माघी गणेशाेत्सवासाठी राज्याच्या कानाकाेपऱ्यांतून भाविक हजाराेंच्या संख्येने दर्शनासाठी येतात. या दिवशी स्थानिक उत्सव समितीच्या माध्यमातून महाप्रसादाचा कार्यक्रमही पार पडताे. माघी गणेशाेत्सवानिमित्तही माेठ्या संख्येने भाविक किल्ल्यातील श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यामुळे १४ आणि १५ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत कुलाबा किल्ल्यात जाणाऱ्या भाविकांकडून काेणतेही शुल्क आकारू नये, अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे. संबंधितांना तातडीने आदेश देऊन अंंमलबजावणी करण्यास सांगावे, अशी विनंतीही खासदार तटकरे यांनी केंद्रीय राज्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली.दरम्यान, माघी गणेशोत्सवानिमित्त राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांच्या चौकटीत राहून हा उत्सव साजरा करा, असा निर्देश राज्य सरकारने उत्सव समित्यांसह विविध मंडळांना दिले आहेत. गणेशमूर्ती, मंडपाच्या आकारावर निर्बंध ठेवण्यात आले आहे.कोरोनामुळे खबरदारी म्हणून राज्य सरकारकडून मंडळांसाठी काही नियम मंडपउभारणीसाठी पालिकेची अथवा स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.मंडप मर्यादित आकाराचा असावा. आगमन-विसर्जन मिरवणुका काढता येणार नाही. सार्वजनिक मूर्तीची उंची चार फूट तर घरगुती मूर्तीची उंची दोन फूट असावी. शक्य असल्यास धातूच्या किंवा संगमरवरी मूर्तीचे पूजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.मंडपात एका वेळी १० पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि १५ पेक्षा अधिक भाविक नसावे.सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी सामाजिक उपक्रम, रक्तदान किंवा आरोग्य शिबिर अशा कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे.ऑनलाइन किंवा केबल नेटवर्कच्या माध्यमातून दर्शनाची सोय करावी. मंडपात सामाजिक अंतराचे पालन करावे. वेळोवेळी मंडपाचे निर्जंतुकीकरण करावे. येणा-या भाविकांची तापमान तपासणी, मुखपट्टीचा वापर, स्वच्छतेचे नियम आदींबाबत दक्षता बाळगावी.विसर्जनालाही केवळ पाच कार्यकर्त्यांना परवानगी असेल.
"माघी गणेशाेत्सवात कुलाबा किल्ल्यावर जाण्यास शुल्क आकारू नये"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 1:53 AM