नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र चर्चेत, सहा महिन्यांपासून ड्रेसिंगसाठी कापूस नसल्याचे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 03:26 AM2018-08-14T03:26:21+5:302018-08-14T03:27:10+5:30
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या महिनाभरापासून अनेक वेळा चर्चेत आले आहे. डॉक्टरांची पदे रिक्त, तर कधी औषधसाठा अपूर्ण, तर कधी स्वछतेचा बोजवारा अशा अनेक अडचणी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात भेडसावत आहेत.
- कांता हाबळे
नेरळ : नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या महिनाभरापासून अनेक वेळा चर्चेत आले आहे. डॉक्टरांची पदे रिक्त, तर कधी औषधसाठा अपूर्ण, तर कधी स्वछतेचा बोजवारा अशा अनेक अडचणी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात भेडसावत आहेत. नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात औषधांचा तुटवडा आणि ड्रेसिंगसाठी लागणारा कापूस अनेक महिन्यांपासून नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पोशीर येथील महेश पांडुरंग राणे यांचा नेरळ-कळंब रस्त्यावर सोमवारी दुपारी १२च्या सुमारास अपघात झाला होता. त्याला उपचारासाठी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्यातून जास्त प्रमाणात रक्तस्राव होत होता. हे रक्त पुसण्याची विनंती नातेवाइकांनी केली असता, आरोग्य केंद्रातील परिचारिकेने कापूस नसल्याचे सांगितले. सहा महिन्यांपासून केंद्रात साधा कापूस नसल्याचे ऐकून रुग्णाच्या नातेवाइकांना धक्काच बसला. येथील औषधालयही अनेक दिवसांपासून बंद आहे.
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दरदिवशी सुमारे २०० ते २५० ओपीडी रुग्णांची संख्या आहे; परंतु रु ग्णांना देण्यासाठी औषध व अन्य काही साहित्य उपलब्ध नसेल तर डॉक्टर असून उपयोग काय, असा प्रश्न रुग्ण व नातेवाइकांकडून विचारण्यात येत आहे.
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर, औषधांचा तुटवडा, अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे; पण प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र फक्त नावालाच उरलेले दिसत आहे. लाखो रु पये खर्चून रुग्णालयांची उभारणी केली जाते; परंतु या रुग्णालयात अनेक सुविधांची वानवा नेहमीच पाहावयास मिळते आणि त्याचा त्रास येथे येणाऱ्या रुग्णांना होतो, त्यामुळे अशा रुग्णालयांकडे शासन कधी लक्ष देणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.
पोशीर येथील महेश राणे यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. येथील नर्सला रक्त पुसण्यासाठी सांगितले असता, रुग्णालयात कापूस सहा महिन्यांपासून नाही, असे येथील नर्सने सांगितले, याकडे कोण लक्ष देणार आणि रु ग्णांना कोण सेवा पुरवणार हा प्रश्न आहे. त्यामुळे याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
- गजानन कोंडीलकर, ग्रामस्थ पोशीर
प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधसाठा घेऊन जाण्याची जबाबदारी प्राथमिक आरोग्य केंद्राचीच असते. नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात शेवटचा औषधसाठा कधी नेला आहे, हे पाहावे लागेल.
- डॉ. सचिन देसाई,
जिल्हा आरोग्य अधिकारी
च्वैद्यकीय अधिकारी ऐश्वर्या पवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी, या संदर्भात मला काहीही माहिती नाही, मी नवीन आहे, माझे काम ओपीडीचे रु ग्ण तपासणे एवढेच; परंतु अनेक प्रकारचा औषधसाठा अपूर्ण असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
च्नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातीतील फार्मसी मनीषा तांबे हे रजेवर असल्याने नेमकी कोणकोणती औषधे नाहीत, याची माहिती मिळू शकली नाही. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.