नेरळ आरोग्य केंद्रात कर्मचारीच नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:58 PM2019-06-03T23:58:22+5:302019-06-03T23:58:28+5:30

डॉक्टर सायंकाळी ६ नंतर गायब : रुग्णांचे हाल; प्रशासन, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

No health workers at the National Health Center! | नेरळ आरोग्य केंद्रात कर्मचारीच नाहीत!

नेरळ आरोग्य केंद्रात कर्मचारीच नाहीत!

Next

कांता हाबळे

नेरळ : कर्जत तालुक्यातील नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरच नसल्याने रु ग्णांचे हाल होत आहेत. या प्राथमिक रुग्णालयात सायंकाळी ६ नंतर एकही डॉक्टर आणि परिचारिका नसल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. यामुळे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांविना पोरके झाल्याची प्रतिक्रिया मिळत आहे.

नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात ३५ हून अधिक गाव व वाड्यांमधून मोठ्या संख्येने रुग्ण कमी खर्चात उपचार घेण्यासाठी येत असतात; परंतु येथे आल्यावर आदिवासी बांधव आणि इतर रुग्णांची निराशा होते, गेली अनेक वर्षे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र अनेक कारणाने चर्चेत आहे. कधी डॉक्टर नाही तर कधी औषधे, रुग्णालयात अस्वच्छता पाहायला मिळत आहे. या नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर मिळावा म्हणून परिसरातील सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे आणि राजेश गायकवाड यांनी दोन वेळा उपोषणही केले आहे. तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर दिले जातात. मात्र, पुन्हा काही दिवसांत परिस्थिती जैसे थेच होते. त्यामुळे येथे येणाºया रुग्णांना खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते.

रविवारी रात्री ८ च्या सुमारास माणगाववाडी येथील पाच वर्षांचा बालक राहुल नामदेव निरगुडा याला विंचू चावल्याने नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते; परंतु येथे डॉक्टर आणि नर्स यांच्या पत्ताच नव्हता. येथील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका हे मोबाइल बंद करून गायब असल्याचे समोर आल्याने सर्वांनी संताप व्यक्त केला. येथे शिपायाव्यतिरिक्त कोणीच उपलब्ध नसल्याने या बालकाला नातेवाइकांनी कर्जत येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले, त्यामुळे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाºया रुग्णांची परवड कधी थांबणार आणि रुग्णांना चांगले उपचार कधी मिळणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण कल्याण समितीचेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राला कोणी वाली राहिला नाही.

नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी डॉ. पावरा आणि डॉक्टर गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माणगाववाडी येथील प्रकरणा संदर्भात मला फोन आला होता, मी बाहेर आलो आहे; परंतु मी सूचना केल्या आहेत. इमर्जन्सी वेळात डॉक्टरने येऊन रुग्णाची तपासणी करणे आवश्यक आहे. - डॉ. सी. के. मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी

नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर मिळावा यासाठी दोन वेळा उपोषण करण्यात आले आहे; परंतु आजपर्यंत अश्वासनेच देण्यात आली आहेत. आतापर्यंत नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राला कायमस्वरूपी डॉक्टर मिळाला नाही. त्यामुळे येथे येणाºया रुग्णांचे हाल होत आहेत, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जोपर्यंत झोपेतून जागे होत नाहीत, तोपर्यंत कायमस्वरूपी डॉक्टर मिळणार नाहीत. - विजय हजारे, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: No health workers at the National Health Center!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.