नियमांचे पालन केल्यास लॉकडाऊन नाही - जिल्हाधिकारी निधी चौधरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 12:22 AM2021-02-20T00:22:55+5:302021-02-20T00:23:24+5:30
Nidhi Chaudhary : रायगड जिल्ह्यातही सोशल मीडियावरून लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवा निर्माण केल्या जात आहेत. यामुळे नागरिकांमध्येदेखील संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
अलिबाग : लॉकडाऊन सर्वस्वी नागरिकांवर अवलंबून आहे, नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास लॉकडाऊन करण्याची गरज पडणार नाही. मात्र नियम मोडून नागरिकांनी जर मोठमोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करून किंवा सहभागी होऊन कोरोनाला निमंत्रण दिले तर मात्र नाइलाजाने लॉकडाऊन केल्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा निर्वाणीचा इशारा रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिला.
रायगड जिल्ह्यातही सोशल मीडियावरून लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवा निर्माण केल्या जात आहेत. यामुळे नागरिकांमध्येदेखील संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लॉकडाऊन करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. मात्र नागरिकांनी त्यासाठी सहकार्य करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असेल तर ती कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची जबाबदारी पोलिसांची आहे.