दापोली (जि. रत्नागिरी) : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दापोली येथे रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली. परंतु, काही निर्बंध लावले जातील, असेही त्यांनी सांगितले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे रविवारी खासगी दौऱ्यानिमित्ताने दापोलीत आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना टोपे म्हणाले, राज्यात कोरोनाच्या संख्येत वाढ झाली आहे. परंतु, दिवाळीमध्ये रुग्ण तपासणीचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या कमी होती. आपण एका दिवसाला ९०,००० तपासणी करतो. दिवाळीत केवळ ३०,००० रुग्णांची तपासणी होत होती. त्यामुळे रुग्णांची संख्या कमी होती. आता पुन्हा ९०,००० लोकांच्या तपासणी करण्यात येत असल्याने आता हा आकडा दिवसाला तीन हजार ते चार हजारावर गेला आहे. प्रत्येक जिल्ह्यात तपासणीचे प्रमाण वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांची तपासणी केली जाणार आहे. पुढील काही दिवसात संख्येत वाढ होईल, असेही टोपे यांनी सांगितले.