एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहता कामा नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 12:40 AM2020-06-09T00:40:55+5:302020-06-09T00:41:14+5:30

श्रीरंग बारणे यांच्या सूचना : कर्जत तहसील कार्यालयात आढावा बैठक

No one should be deprived of help | एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहता कामा नये

एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहता कामा नये

Next

कर्जत : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ, कर्जत, खालापूर, उरण आणि पनवेल तालुक्याला बसला आहे. या परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सरकारने त्यासाठी मदत जाहीर केली आहे. या मदतीपासून एकही नुकसानग्रस्त वंचित राहता कामा नये. त्यासाठी सर्व नुकसानग्रस्तांचे काळजीपूर्वक पंचनामे करावेत. त्याचा अहवाल तत्काळ सरकारला पाठवावा, अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी कर्जत, खालापूरमधील निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा सोमवारी आढावा घेतला. कर्जत येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीला प्रांताधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार विक्रम देशमुख, महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र घुले, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, नगरसेवक संतोष पाटील, वेद दांडेकर, नगरसेविका प्राची डेरवणकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख बाबू घारे उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका रायगड जिल्ह्याला बसला आहे. त्यात कर्जत, खालापूर, उरण, पनवेल तालुक्यांना फटका बसला आहे. त्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सविस्तर आढावा घेतला आहे. या नुकसानीची १०० टक्के भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. त्यासाठी पंचनामे सुरू झाले आहेत. एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहू नये. ज्यांच्या पिकांचे, आंब्यांचे, झाडे आणि घरांचे नुकसान झाले आहे त्याची १०० टक्के भरपाई दिली पाहिजे. बाधित शेतकरी, नागरिकांना मदत मिळण्यासाठीचे सर्व पंचनामे काळजीपूर्वक पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सर्वांना मदत मिळाली पाहिजे. त्याचा अहवाल तत्काळ सरकारला पाठवावा, असे सूचित केले.

चार-पाच दिवसांत वीज सुरळीत होईल
वादळाचा महावितरणालादेखील फटका बसला आहे. विद्युत तारांवर झाडे पडली आहेत. अनेक ठिकाणचे पोल पडले आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला आहे, पण खेड्यापाड्यातील विजेची अद्याप दुरुस्ती झाली नाही. येत्या चार ते पाच दिवसांत ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन महावितरणने दिल्याचेही खासदार बारणे यांनी सांगितले.

Web Title: No one should be deprived of help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड