सतत हात धुवा सांगणाऱ्यांच्या नळाला नाही पाणी; मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:53 AM2020-05-29T00:53:56+5:302020-05-29T00:54:04+5:30
- अरुण जंगम म्हसळा : मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत मेंदडी, वारळ व खरसई ही तीन उपकेंद्रे, १६ ग्रामपंचायती ...
- अरुण जंगम
म्हसळा : मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत मेंदडी, वारळ व खरसई ही तीन उपकेंद्रे, १६ ग्रामपंचायती व छोटी-मोठी २४ गावे, वाड्या असून सुमारे १४,००० लोकसंख्येला या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सेवा मिळत असते. प्रति महा. सरासरी १००० ते १२०० रग्णांवर उपचार होत असतात. कोरोना काळात सातत्याने हात धुवा, असे जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत सांगण्यात येत आहे. मात्र मेंदडी आरोग्य केंद्रातील रुग्णांना व कर्मचाऱ्यांना हात धुण्यासाठी पाणी नसण्याची केविलवाणी परिस्थिती आहे.
आपल्या हद्दीतील नागरिक स्त्रिया आणि मुलांच्या आरोग्याकरता आखलेले राष्ट्रीय कार्यक्रम हिवताप, हत्तीरोग, टी.बी., लैंगिक रोग आणि एड्स वगैरे आजारांचे ताप, गरोदरपण, बाळंतपण आणि बाळंतपणानंतर लागणारी आरोग्य सेवा या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून पुरवल्या जातात. या विविध आरोग्य सेवांसोबतच मुंबईवरून सुमारे ६५०० आलेल्या चाकरमान्यांना क्वारंटाइन करणे व पश्चात अन्य सेवा पुरवत असतानाच प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे वॉश बेसीन, बाथरूम व अन्य ठिकाणी नळांना पाणीच नसल्याची तक्रार काही रुग्णांनी ‘लोकमत’कडे के ली.
तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कोरोनात गुंतल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र मेंदडीच्या दवाखानाच्या मूलभूत व प्राथमिक सोयी-सुविधांकडे जिल्हा परिषद आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत आहे. दवाखान्याबाहेरील एक नळ सुरू आहे तर अंतर्गत वितरण व्यवस्था अगर स्टोअरेज टाक्या रिकाम्या असून नळाला पाणी नाही. यामुळे येथील रुग्णांचे आणि कर्मचाºयांचे हाल होत आहेत.
मागील रुग्ण कल्याण समितीच्या दोन सभांतून प्राथमिक आरोग्य केंद्र मेंदडीसाठी अंतर्गत पाणीपुरवठा व्यवस्था दुरुस्त करून पाणीपुरवठा पूर्ववत व्हावा याबाबत ठराव घेतले. यासाठी अनेक वेळा पदाधिकारी व अधिकाºयांकडे पाठपुरावा केला, क्लार्क तीन महिन्यांपासून कार्यालयात येत नसल्यामुळे काम थांबलेले असल्याचे सांगण्यात आले.
- महेंद्र पारेख, रुग्ण कल्याण समिती, प्रा.आ. केंद्र, मेंदडी
जिल्हा परिषद प्रशासनामार्फत जिल्ह्यातील आरोग्य सेवक-सेविकांचे वेतन प्रलंबित नाही. मेंदडी ग्रामपंचायत हद्दीत पाणीटंचाई आहे असे समजते.
- डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. अलिबाग
म्हसळा तालुक्यातील मेंदडी ग्रामपंचायत हद्दीत सुरळीत पाणीपुरवठा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र मेंदडी येथील अंतर्गत वितरण व्यवस्थेत काही अडचणी असतील.
- युवराज गांगुर्डे, उपअभियंता, ग्रा. पा. पुरवठा, म्हसळा