वृक्षांची होळी नको - मानकवळे
By admin | Published: March 11, 2017 02:20 AM2017-03-11T02:20:30+5:302017-03-11T02:20:30+5:30
होळी हा सण सर्वत्र साजरा क रण्यात येतो; परंतु होळीसाठी दरवर्षी हजारो वृक्षांची तोड केली जाते आणि त्याचा परिणाम निसर्गावर होताना दिसत आहे.
- सुनील बुरुमकर, कार्लेखिंड
होळी हा सण सर्वत्र साजरा क रण्यात येतो; परंतु होळीसाठी दरवर्षी हजारो वृक्षांची तोड केली जाते आणि त्याचा परिणाम निसर्गावर होताना दिसत आहे. त्याकरिता निसर्गप्रेमींनी याची जाण ठेवून झाडांचे जतन होण्यासाठी या वृक्षतोडीच्या विरोधात आवाज उठविला आहे. असेच एक निसर्गप्रेमी प्रा. उदय मानकवळे हे निसर्गासाठी झटत असून, वृक्षतोड थांबविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ‘झाडे तोडण्यापेक्षा झाडे लावा’ हा संदेश ते देत आहेत.
हिंदू संस्कृतीप्रमाणे या सणाला पुरातन कथांचा आधार असतो आणि त्यानुसार आपण सण साजरे करत असतो. पुरातन दंतकथांच्या आधारावर ज्या दिवशी वाईट किंवा दृष्ट प्रवृत्तीचा नाश होतो त्याची आठवण आणि आपल्याकडून वर्षभरातून कळत- नकळत वाईट गोष्टी घडलेल्या असतात. त्यापासून माफी मागून नवीन वर्ष सुखाचे आणि चांगले जावो, अशी प्रार्थना करतो. हा त्या मागेचा हेतू असतो. होळी हा सण अगदी पुरातन काळापासून परंपरागत पद्धतीने म्हणजे जिवंत झाडे तोडून ती जाळून होळी करत; पण आपण त्या गोष्टीकडे कधी गांभीर्याने पाहिले नाही. झाडे तोडल्यामुळे होणारा निसर्गाचा ऱ्हास, त्यामुळे आपण आज त्याचे परिणाम भोगत आहोत. याच विरोधात गेली २० वर्षे पेण येथील वृक्षमित्र प्रा. उदय मानकवळे हे आवाज उठवत आहेत; परंतु त्यांना तेवढे यश मिळत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
शासनामार्फत याचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. मानकवळे हे स्वत: दरवर्षी दहा हजार झाडांची स्वखर्चाने निर्मिती करून ते ती झाडे लावण्यासाठी दान करतात. तसेच पत्रके वाटून गावातील किंवा वाडीमध्ये जाऊन झाडांविषयी महत्त्व पटवून वृक्षतोड होऊ नये यासाठी जनजागृती करण्याचे काम गेली कित्येक वर्षे करीत आहेत.
मानकवळे यांच्या म्हणण्यानुसार पर्यावरण संतुलनासाठी मनुष्यप्राणी व इतर जीवजंतूंना जगण्यासाठी किमान ३३ टक्के भूभागावर जंगले किंवा नैसर्गिक एको सिस्टीम असणे आवश्यक आहे; परंतु महाराष्ट्रात केवळ १९ टक्के वनक्षेत्र अस्तित्वात आहे आणि ते घटत घटत १६ टक्क्यांवर येऊन थांबले आहे.
नैसर्गिक असंतुलनामुळे विविध आजारांना आपण बळी पडत आहेत. होळीमध्ये जिवंत झाडे तोडून जाळली जाणारी झाडे जाळत नाहीत, तर मानवाचे भविष्य, येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य जाळत आहेत. त्यामुळे हे टाळून सण आनंदाने व आरोग्याने साजरे करावे, असे त्यांनी आवाहन केले आहे.
वृक्ष संवर्धनाची गरज
1प्रत्येक झाडाचे जतन केले पाहिजे, कारण प्रत्येक झाडामध्ये ईश्वर आहे आणि झाडाची कत्तल करणे म्हणजे ईश्वराची कत्तल केल्यासारखी आहे, त्यामुळे वृक्ष संवर्धन महत्त्वाचे आहे.
2रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून पथक नेमून वृक्षतोड करू नये याबाबत माहिती देण्याचे काम वन विभागामार्फत चालू आहे. तसेच अलिबाग तालुक्यात संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांच्यामार्फतही जनजागृती केली जात आहे.
3‘जंगल वाचले तर जीवन वाचेल’ अशी माहिती गावागावातून दिली जात आहे. यावर्षी २५ हजार पत्रके छापून ती शाळा, कॉलेज, बसस्टँड व अन्य ठिकाणी वाटली जात आहेत. तसेच रात्रीची गस्तसुद्धा घातली जात आहे.