पाणी नाही तर दुपारचे जेवणही नाही; ८ दिवसांपासून जिल्हा परिषद शाळेत चूल पेटली नाही
By राजेश भोस्तेकर | Published: April 9, 2024 08:02 AM2024-04-09T08:02:57+5:302024-04-09T08:03:34+5:30
आठवडा झाला, रायगडमधील नेहुली जिल्हा परिषद शाळेत चूल पेटली नाही
राजेश भोस्तेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : रायगडमधील पाणीटंचाईची झळ आता शाळांपर्यंत पोहोचली आहे. अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नेहुली शाळेत पाणी नसल्याचे कारण देत शाळेत माध्यान्ह भोजन शिजले नाही. त्यामुळे आठवड्यापासून विद्यार्थ्यांना घरून डबा घेऊन जावे लागत आहे. निवडणुकीची धामधूम सुरु असल्याने या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना वेळ मिळालेला नाही.
खंडाळे ग्रामपंचायत हद्दीत नेहुली गावात पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत १६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या गावात अनेक वर्षांपासून पाणी समस्या आहे. एमआयडीसीमार्फत गावात पाणीपुरवठा होत असतो. मात्र, सध्या पंधरा दिवसांनी एकदा पाणी मिळत आहे. तर खासगी वाहिनीवरून सध्या ग्रामस्थ पाणी घेत आहेत. शाळेतही पाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. मात्र, सध्या शाळेत पाणी येत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.
आठवडाभर विद्यार्थी आणताहेत घरून डबा
गेल्या आठवड्यापासून शाळेत पाणी नसल्याने अन्न शिजविण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे माध्यान्ह भोजन बंद झाले आहे. विद्यार्थी सध्या शाळेत येताना घरून डबा घेऊन येत आहेत.
प्रशासन अनिभज्ञ
संबंधित समस्येबाबत शाळा व्यवस्थापनाने शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना कोणतीही माहिती दिलेली नाही. याबाबत शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांना संपर्क केला असता माहिती घेते, असे म्हणाल्या. तर अलिबागच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क झाला नाही.
शिक्षिकेचे म्हणणे काय?
जिल्हा परिषदेच्या नेहुली शाळेतील शिक्षका मेधा पाटील यांना याबाबत विचारले असता, त्यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शविली.