पाणी योजना नावाला, पाणी नाही नळाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 02:27 AM2020-01-19T02:27:10+5:302020-01-19T02:28:41+5:30
पाणी योजना दहिवली ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या वंजारपाडा गावासाठी तयार करण्यात आली होती. मात्र, ही पाणी योजना नावापुरती ठरल्याने नळ कोरडे पडले आहेत.
- कांता हाबळे
नेरळ : कर्जत तालुक्यातून बारमाही वाहणारी उल्हास नदी तालुक्यासाठी वरदान आहे. या नदीवर अनेक पाणीयोजना कार्यन्वित असून, अनेक गावांची तहान ही नदी भागवते. अशीच पाणी योजना दहिवली ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या वंजारपाडा गावासाठी तयार करण्यात आली होती. मात्र, ही पाणी योजना नावापुरती ठरल्याने नळ कोरडे पडले आहेत. त्यामुळे पाण्यासाठी वंजारपाड्यातील ग्रामस्थांची तारांबळ उडत असून, महिलांना रात्र विहिरीवर जागून काढावी लागत आहे. दरम्यान, पाणीयोजनेच्या चौकशीसाठी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे थेट जिल्ह्यधिकाऱ्यांना साकडे घातले आहे.
कर्जत तालुक्यातील दहिवलीतर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीतील वंजारपाडा, शेंडेवाडी या गावांसाठी २०१३-१४ मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पाणी योजना तयार करण्यात आली होती. एका वर्षाच्या आत योजना पूर्ण करून कार्यान्वित करण्यात आली.
उल्हास नदीवरून साधारण दीड कि.मी. अंतरावरून पाणी गावात आणले गेले. गावात घरोघरी नळही बसवले गेले, नळाला पाणी आले. मात्र, आता ही पाणी योजना नावापुरती उरली आहे. पाणी योजना कार्यान्वित झाल्यानंतर पाणीपुरवठा समितीने ग्रामपंचायतीकडे ही योजना हस्तांतर केलीच नाही आणि नळाला आलेल्या पाण्याचे कोणाला बिलही आले नाही. परिणामी, योजना आता नावापुरती उरली आहे. ४९ लाख रुपये एवढा निधी खर्च करून बनवलेल्या या पाणी योजनेची जलवाहिनी प्लास्टिकची आहे, त्यामुळे ती सतत कुठेतरी फुटते. विजेचे बिल थकीत आहे, तर मोटार चोरीला जाण्याच्या आणि त्या व्यवस्थित न हाताळल्यामुळे जळण्याच्या घटना अनेकदा घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परिणामी, पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे.
गावातील एकमेव विहिरीवर महिलांची गर्दी होत आहे. मात्र, विहिरीलाही पाणी मर्यादित असल्याने पाण्यासाठी महिलांना रात्री विहिरीवर मुक्काम करावा लागत आहे. अनेकदा बैठकी घेऊन पाणीपुरवठा समितीकडे याबाबत विचारणाही करण्यात आली आहे. मात्र, समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गावातील या पाणीबाणीमुळे ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, योजनेच्या चौकशीसाठी थेट जिल्हाधिकारी रायगड यांना तक्रारी अर्ज सादर केला आहे.
पाणी योजना सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वीजपुरवठा कमी-जास्त प्रमाणात होत असल्याने मोटार जळाली होती, ती दुरुस्त करून लवकरात लवकर गावात पाणीपुरवठा सुरू होईल.
- बाबूराव माळी,
सचिव, पाणीपुरवठा समिती
वयामुळे डोक्यावरून हंडे भरून आणणे आता शक्य होत नाही आणि आणलेले पाणी पुरतही नाही. पाणी विकत घेण्यासाठी पैसे नसल्याने आम्ही करायचे काय? पाण्याविना मरण पत्करावे का?
- मनुताई धुळे,
वयोवृद्ध महिला ग्रामस्थ
बायकांना घरातली कामे आणि पाणी दोघांचा मेळ बसवावा लागतो; पण तो न बसल्याने आमची तारांबळ उडते. एवढी पाणी योजना गावात येऊन तिचा आम्हाला काय फायदा झाला?
- मंदाबाई आगे,
महिला ग्रामस्थ