- संजय करडेमुरुड : मुरुडकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्याप्रति शासन गंभीर असले तरी प्रशासन मात्र उदासीन असल्याचे चित्र दिसून येत आहे. या रुग्णालयात मुरुडसह लगतच्या २२ गावांतून रुग्ण येत असतात. येथे डॉक्टरच उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.मुरुड ग्रामीण रुग्णालयात ५ आॅक्टोबर रोजी डॉ. सुमय्या शेख यांचा नियुक्ती कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी चार्ज सोडला आहे. तसेच यापूर्वी नियुक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर गंगलवार व डॉ. प्रतिमा चतरमल हेही सोडून गेले आहेत. ३१ मार्च २०१९ रोजी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण बागुल सेवानिवृत्त झाल्यानंतर पूर्णवेळ अधीक्षक पद भरले गेलेले नाही. परिणामी, १५० ते २०० घरात असलेली बाह्यरुग्ण सेवा २५ ते ३० वर आली आहे. ७ आॅक्टोबर २०१९ पासून ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पर्यायी नियुक्ती न केल्याने गोरगरीब रुग्णांना कोणी वाली उरला नसल्याची स्थिती आहे.ग्रामीण रुग्णालयात दंत चिकित्सक आहेत. मात्र, दंत चिकित्सा करण्यासाठी डॉक्टरांना खुर्ची नाही. नेत्रचिकित्सातज्ज्ञ पदही रिक्त आहे. एकंदरच ग्रामीण रुग्णालयाची स्थिती नाजूक आहे. मुरुडकर जनतेच्या भावना समजून जिल्हा शल्यचिकित्सकांनी या बाबतीत निर्णय घेऊन डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. दवाखाने आहेत; परंतु डॉक्टर नाही, त्यामुळे रुग्णाचे हाल होत आहेत. या संदर्भात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. पडोळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.सद्यस्थितीत ग्रामीण रुग्णालयात नियमित वैद्यकीय अधिकारी नाहीत, ही वस्तुस्थिती उद्या आलिबाग येथे होणाºया मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडणार आहेत. नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातही डॉक्टर नाहीत.- डॉ. चंद्रकांत जगताप,वैद्यकीय अधिकारी, मुरुड तालुका
ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरच नाही! रुग्णांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 2:25 AM