वाहतूक नियंत्रक नव्हे; देवदूत
By admin | Published: August 4, 2016 12:40 AM2016-08-04T00:40:44+5:302016-08-04T01:25:09+5:30
चालक - वाहकांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून सतर्क केले. मोहिते हे देवदूत बनले.
सुभाष कदम-- चिपळूण --विधिलिखित कधीही टळत नाही आणि टाळायचे म्हटले तरी टाळता येत नाही. मुंबई - गोवा महामार्गावर सोमवारी मध्यरात्री काळ दबा धरून बसला होता. रात्री ११.३०च्या सुमारास सावित्री नदीला पूर आल्याने राजेवाडी फाट्यावरील ब्रिटिशकालीन पूल वाहून गेला. हे वृत्त चिपळूण आगारात वाहतूक नियंत्रक सिध्दार्थ मोहिते यांना समजताच त्यांनी महामार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांच्या चालक - वाहकांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून सतर्क केले. मोहिते हे या वाहन चालकांसाठी देवदूत बनले.
मुंबई - गोवा महामार्गावर पोलादपूर ते महाडदरम्यान राजेवाडी फाटा येथे असलेला ब्रिटिशकालीन पूल पाण्याच्या लोंढ्याबरोबर वाहून गेला. या पुरात जयगड-मुंबई व राजापूर - बोरिवली या दोन बसेसबरोबर काही खासगी गाड्याही वाहून गेल्याची शक्यता आहे. पुलाशेजारी असणाऱ्या एका गॅरेजच्या कामगाराने ही दुर्घटना पाहिली आणि त्यांनी संपर्क साधला.
चिपळूण आगारात रात्री १२ नंतर या घटनेची माहिती मिळाली आणि एकच हलकल्लोळ माजला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून यावेळी सिध्दार्थ मोहिते यांनी मन घट्ट केले आणि सर्व चालक - वाहकांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. चिपळूणहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांची नोंद चिपळूण आगारात होते. त्यामुळे त्या चालकांशी संपर्क साधणे सोपे झाले, तर मुंबईहून चिपळूणकडे येणाऱ्या अनेक गाड्यांनाही मोहिते यांनी महाडपर्यंत थांबवल्या. मुंबई-चिपळूण ही गाडीही महाड आगारात थांबली होती. जयगड - मुंबई व राजापूर-बोरिवली या दोन गाड्या पुराच्या पाण्यात वाहून जाण्यापूर्वी चिपळूण आगारातून मुंबईकडे गाडी घेऊन गेलेले अरुण सुर्वे हे चालक बालंबाल बचावले. कारण या तिन्ही गाड्या एकाचवेळी धावत होत्या. सुर्वे यांची गाडी पूल पास झाल्यानंतर पाण्याचा लोंढा आला असावा. दोन गाड्या वाहून गेल्याचे समजताच कापसाळ येथील सुर्वे यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी संपर्क झाल्याने ते सुखरुप असल्याचे समजले. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा नातेवाईकांना प्रत्यय आला. एकूण ११ गाड्या मोहिते यांनी थांबवल्या. परंतु, बेपत्ता झालेल्या दोन गाड्यांच्या चालक - वाहकांशी सकाळपर्यंत संपर्क होऊ शकला नाही. रात्रीची वेळ होती. त्यातच मुसळधार पाऊस कोसळत होता. नदी नाले आक्राळविक्राळ होऊन तुडुंब भरुन वाहत होते. अशावेळी मोहिते यांनी जे धैर्य दाखवले ते कौतुकास्पद होते. त्यांनी चालक - वाहकांबरोबरच एस. टी.च्या अधिकाऱ्यांशीही तत्काळ संपर्क साधून घटनेची माहिती दिली. बुधवारी दुपारी ११ वाजेपर्यंत ते कार्यरत होते.