बायोमेट्रिक पद्धत न वापरल्याने ७० रेशनिंग दुकानदारांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 02:11 AM2018-07-17T02:11:31+5:302018-07-17T02:11:35+5:30

शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत रेशनिंग धान्याचा पुरवठा होण्यासाठी लाभार्थ्यांचे आधारकार्ड रेशनिंग दुकानांना संलग्न केले आहे.

Not using 70% rationing shoppers for not using biometric method | बायोमेट्रिक पद्धत न वापरल्याने ७० रेशनिंग दुकानदारांना नोटिसा

बायोमेट्रिक पद्धत न वापरल्याने ७० रेशनिंग दुकानदारांना नोटिसा

Next

- आविष्कार देसाई 
अलिबाग : शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत रेशनिंग धान्याचा पुरवठा होण्यासाठी लाभार्थ्यांचे आधारकार्ड रेशनिंग दुकानांना संलग्न केले आहे. परंतु रेशन धान्य दुकानदार धान्य वाटप करताना बायोमेट्रिक पद्धतीचा वापर करत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्याविरोधात जिल्ह्यातील ७० रेशनिंग दुकानदारांविरोधात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अलिबाग, पनवेल, खालापूर, उरण आणि पनवेल तालुक्यात ही कारवाई करण्यात आली असली तरी, अन्य तालुक्यांमध्येही कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली.
केशरी, पिवळे आणि बीपीएलमधील लाभार्थ्यांना किमान स्वस्त दरात रेशन उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने सरकारी रेशन दुकानावर रेशन देण्याची सोय केलेली आहे. प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या नावावरचे रेशन हे काही रेशनिंग दुकानदार परस्पर विकत असल्याच्या तक्रारी होत होत्या. त्यामुळे सरकारने रेशनिंगच्या दुकानामध्ये आधार सक्ती केली. त्यानुसार प्रत्येक लाभार्थ्याच्या हाताच्या बोटाचे ठसे, नाव, पत्ता याची माहिती सरकारकडे आधार लिंक केल्याने आहे. लाभार्थ्याने रेशनिंग दुकानातून रेशन घेताना त्याला आधीच बायोमॅट्रिक नोंद करणे अनिवार्य आहे. त्यामुळे कोणत्या लाभार्थ्याने कोणते आणि किती रेशन कोणत्या तारखेला नेले याची नोंद सरकारच्या पोर्टलवर होते. त्यामुळे रेशन चोरी करणे अथवा परस्पर विकणे याला चांगलाच आळा बसला आहे. परंतु यातूनही काही रेशनिंग दुकानदार गडबड करीत असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाने याची माहिती घेण्यास सुरुवात केली. बायोमेट्रिक पध्दतीने कामकाज न करणारे ७० रेशनिंग दुकानदार अलिबाग, पेण, पनवेल, उरण आणि खालापूर तालुक्यात आढळून आले. त्यामुळे त्यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी एल.एम.दुफारे यांनी दिली. पहिल्या टप्प्यामध्ये ७0 रेशनिंग दुकानदार आढळले आहेत. कारवाईबाबतची प्रक्रिया सर्वत्रच केली जात आहे. त्यामध्ये नियम धाब्यावर बसवणारे सापडण्याची शक्यताही व्यक्त केली.
रायगड जिल्ह्यामध्ये एक हजार ३५९ रेशनिंगची दुकाने आहेत. त्यामध्ये अलिबाग-८२,पेण-११२, मुरुड-३२, पनवेल-१९३, उरण-६७, खालापूर- १३२, कर्जत-१४२, माणगाव-१0६,रोहे-९७, तळा-३४, सुधागड-७५, महाड-१३0, पोलादपूर-७१, म्हसळा-४२, श्रीवर्धन-४४ आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये तब्बल तीन लाख ४३ हजार रेशनिंग लाभार्थ्यांची संख्या आहे. प्राधान्य गटातील ९४ टक्के आणि अंत्योदय गटातली ८४ टक्के लाभार्थ्यांचे आधारकार्ड लिंक करून झाले आहे. प्राधान्य गटातील सहा टक्के आणि अंत्योदय गटातील १६ टक्के लाभार्र्थ्यांचे आधारकार्ड लिंक झालेले नाही.
बायोमेट्रिक पध्दतीने लाभार्थ्याला धान्य देताना त्याच्या हाताच्या बोटाचे ठसे जुळून येत नसतीलही तसेच नेटवर्कचीही अडचण असेल, परंतु काही ठिकाणी काही दुकानदार याच कारणांचा आधार घेऊन लाभार्थ्यांना वंचित ठेवत असल्याच्या तक्रारी मध्यंतरी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सरकारने आणि प्रशासनाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. रेशनिंग दुकानदार सातत्याने हीच कारणे पुढे करत असेल तर व्यवहारावर खरेच लक्ष ठेवण्याची गरज आहे.
>रेशनिंग दुकानदारांच्या समस्या
लाभार्थी रेशनिंग घेण्यासाठी येतो तेव्हा बायोमेट्रिक पद्धतीने त्याला धान्य देताना त्याच्या हाताच्या बोटाचे ठसे जुळून येत नाही, तर कधीकधी नेटवर्क नसल्यामुळेही अडचणी येतात. त्यामुळे बायोमेट्रिकची अंमलबजावणी करता येत नाही, असे रेशनिंग दुकानदारांचे म्हणणे आहे.

Web Title: Not using 70% rationing shoppers for not using biometric method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.