दासगाव : औद्योगिक वसाहत परिसरात हवा आणि पाण्याचे प्रदूषण करणाºया चार कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदची नोटीस बजावली आहे, तर एका कारखान्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महाड औद्योगिक वसाहतीतील कारखानदार प्रदूषणमुक्तीच्या किती गप्पा मारत असले तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या या नोटिसीमुळे महाड औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाचे पितळ उघडे पडले आहे. इप्का, वसुंधरा, एस. आर. के मिकल, हायकल आणि शॉलको इंडस्ट्रीज अशी नोटिसा बजावण्यात आलेल्या कारखानदारांची नावे आहेत.महाड औद्योगिक वसाहतीमध्ये सध्या प्रदूषणमुक्ती पर्यावरणपूरक धोरणाच्या गप्पा कारखानदार मारत आहेत. लहान-मोठे सर्वच कारखानदार प्रदूषणमुक्ती आणि नियंत्रणासाठी लाखो, कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुका केल्याचे सांगतात. या माध्यमातून आपण झीरो डिस्चार्ज धोरण अवलंबल्याचे देखील सांगत आहेत. असे असले तरी औद्योगिक वसाहतीतील परिस्थिती याला दुजोरा देत नाही. ठिकठिकाणी रंगीबेरंगी रसायनांनी भरून वाहणारे नाले, डबकी, आकाशात वेगवेगळ्या रंगाची धूळ दिसतात. याच परिस्थितीत ६ सप्टेंबर रोजी महाड औद्योगिक वसाहतीतून वाहणाºया जीते गावातील नाल्यात हजारो मृत मासे सापडले. या प्रकरणी जल प्रदूषणाचा ठपका ठेवत प्रदूषण नियंत्रण मंडळाने वसुंधरा रसायन, एस. आर. केमिकल, हायकल या तीन कारखान्यांना बंदच्या नोटिसा बजावल्या आहेत. तर जिते नाल्याशेजारी इप्का या औषध बनवणाºया कारखान्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.महाड औद्योगिक वसाहतीतील कारखानदार सुरुवातीपासून येथील पर्यावरणाचा विचार न करता प्रदूषण करीत आहेत. यापूर्वी बँक गॅरंटी जप्त करणे, बंदची नोटीस बजावणे अगर वीज, पाणी तोडून कारखाना बंद करणे अशा कारवाया प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळोवेळी केल्या आहेत. २०११ मध्ये अशाच प्रकारे पाणी प्रदूषण केल्याप्रकरणी महाडमधून २४ कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने टाळे ठोकून न्यायालयात खेचले होते. त्यानंतर सुधारणांचे निष्कर्ष लावून कारखाने पुन्हा सुरू करण्यात आले होते. गेली दोन-तीन वर्षे न्यायालयाच्या या नियमांचे पालन करणारे महाडमधील कारखानदार पुन्हा मोकाट झाले आहेत. त्याचे चित्र या वर्षाच्या पावसाळ्यात महाड औद्योगिक वसाहतीतील ठिकठिकाणी दिसत आहे. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिसी बजावण्याची कामगिरी केल्याने महाड औद्योगिक वसाहत परिसरात ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. मात्र ही कारवाई केवळ नोटिसांपुरती मर्यादित न राहता प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणी कठोर आणि ठोस पावले उचलावी, अशी मागणी औद्योगिक वसाहतीतील रहिवासी आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे.शॅल्को इंडस्ट्रीजला वायू प्रदूषणाची नोटीस स्टेनलेस स्टील आणि लोखंडी औद्योगिक वापरातील पाइप बनवणारी महाड औद्योगिक वसाहतीमधील शॅल्को इंडस्ट्रीज हा एकमेव कारखाना आहे.या कारखान्याचा तसा प्रदूषणाशी अगर रसायनांशी प्रत्यक्ष संबंध दिसून येत नसला तरी पाइप क्लिनिंग आणि हिटिंगचे प्रोसेसमध्ये रासायनिक पद्धतीचा अवलंब केला जातो.या कारखान्यामध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्र गरजेप्रमाणे नाही आणि हा कारखाना वायू प्रदूषण करीत आहे. असे दोन वेगवेगळे आरोप ठेवत प्रदूषण नियंत्रण मंडळाने शॅल्को इंडस्ट्रीजला या कारखान्याला बंदची नोटीस बजावली आहे.परिस्थितीची पाहणी करून या पाच कारखान्यांना नोटिसी बजावण्यात आल्या आहेत. झालेल्या चुकांची आणि कार्यपद्धतीतील सुधारणा केल्यानंतर पुढील कारवाईबाबत वरिष्ठ कार्यालयात प्रस्ताव पाठवण्यात येईल.- प्रमोद आर. माने, उपप्रादेशिक अधिकारी प्रदूषण मंडळ, महाड
महाड एमआयडीसीतील चार कारखान्यांना बंदच्या नोटिसा, वायू आणि जल प्रदूषणाचा ठपका, प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 6:13 AM