कर्जत : कर्जत रेल्वे स्थानकानजीक भिसेगाव हद्दीतील टेकडीवर एका विकासकाने टेकडी खोदून विकासकाम सुरू केले होते. अर्धवट खोदलेल्या टेकडीची माती खाली येऊ नये म्हणून भली मोठी संरक्षक भिंत बांधली होती. या भिंतीचा काही भाग इमारतीचे काम सुरू असताना कोसळल्याने कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त होत असतानाच विकासकाला नगरपरिषदेने संरक्षक भिंत आरसीसी पद्धतीने बांधण्याचे सूचित केले होते. परंतु त्या भिंतीचे काम प्लम पद्धतीने केल्यामुळे भिंत मजबूत झाली नाही आणि भिंतीचा काही भाग १५ आॅक्टोबर रोजी कोसळला त्यामुळे तेथील रहिवाशांनी नगरपरिषदेकडे तक्रार केली. विकासकाला काम बंद करण्याची नोटीस नगरपरिषदेने बजावली आहे.भिसेगाव सर्व्हे नं. ४३/क/१अ/१/अ भू क्र मांक१ ते ३३ येथील टेकडीवरील एकूण क्षेत्र १८ हजार ८३३.८५ चौ. मीटर या भूखंडावर सिद्धिविनायक इंटरप्रायझेस कंपनीने २२ मार्च २०१६ नगरपरिषदेकडून १९ हजार ७८४.८७ चौ. मीटर बांधकामाची परवानगी मागितली. त्यानुसार नगरपरिषदेकडे जोते (प्लिंथ) पर्यंत बांधकाम करण्याची परवानगी दिली होती. या भूखंडावर विकासक सात मजल्यांच्या पाच इमारती बांधणार असून त्या इमारतींमध्ये ४२० निवासी सदनिका आणि सहा दुकानाचे गाळे असा आराखडा सादर केला होता. हा भूखंड डिसेंबर २००१ साली जिल्हाधिकारी रायगड यांच्या परवानगीने बिनशेती झाला. त्यावर इमारती बांधण्याची परवानगी नगरपरिषदेकडून मिळाली, परंतु सुरु वातीला केवळ जोते म्हणजे प्लिंथपर्यंतच बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली होती. पुढील बांधकामाच्या परवानगीसाठी २८ फेब्रुवारी २०१७रोजी नगरपरिषदेकडे मागितली होती. मात्र, त्याची फी भरली नाही व जोते (प्लिंथ) पूर्ण झाल्याचा दाखला न घेतल्यामुळे नगरपरिषदेने परवानगी दिली नव्हती, तरीही विकासकाने तीन मजल्यांचे बांधकाम केल्याचे संरक्षक भिंत पडल्यानंतर ही बाब उघड झाली आहे.नगरपरिषदेने कशा प्रकारे संरक्षक भिंतीचे बांधकाम करावे याची सूचना दिली होती, परंतु नगरपरिषदेचे सूचनापत्र केराच्या टोपलीत टाकून विकासकाने आरसीसी पद्धतीऐवजी प्लम पद्धतीने बांधल्याने या भिंतीचा काही भाग १५ आॅक्टोबर रोजी दुपारी२ वाजता कोसळला. त्याठिकाणी तलाठी, नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाचे कर्मचारीपोहचले व त्यांनी पडलेल्या भिंतीचा पंचनामा केला. पंचनामा संबंधितांना सादर केला.
बांधकामाला दिली बंदची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 4:28 AM