प्रदूषण करणाऱ्या तीन कंपन्यांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:24 PM2018-10-13T23:24:01+5:302018-10-13T23:24:19+5:30
दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीमधून वाहणाºया टेमघर नाल्यातील माशांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी ...
दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीमधून वाहणाºया टेमघर नाल्यातील माशांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी प्रदूषण मंडळाच्या महाड उपविभागीय कार्यालयाने तीन कंपन्यांना नोटीस बजावली आहे.
महाड एमआयडीसीमधील टेमघर गावातून येणाºया नाल्यामध्ये सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात मासे मेलेल्या अवस्थेत आढळून आले होते. या नाल्याच्या कडेला असलेल्या कंपन्यांकडून रासायनिक सांडपाणी सोडले गेले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, त्याप्रमाणे महाड प्रदूषण नियंत्रण मंडळाने शोध घेतला असता, इफ्का लॅबोरेटरी, मीनाक्षी मानसी केमिकल आणि प्रदीप शेट्टे प्रा. लि. या तीन कंपन्यांचे पाणी नाल्याला मिळाले असण्याचा संशय व्यक्त करून, या तीन कंपन्यांना प्रस्तावित नोटीस बजावली आहे. शिवाय, तीनही कंपन्यांच्या बाहेरील पाण्याचे नमुने गोळा केले असून, त्याच्या तपासणी अहवालानुसार कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण,आग व वायुगळतीने असुरक्षितता निर्माण झालेली आहे. औद्योगिक क्षेत्रामधून टेमघर नाला वाहतो व या नाल्याकिनारी अनेक कारखाने आहेत.
पावसाळ्यात काही कारखाने आपले सांडपाणी थेट नाल्यात सोडत असतात. यावर एमआयडीसी व प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अंकुश राहिलेला नाही. टेमघर नाला पुन्हा अशाच प्रकारे प्रदूषित झाल्याने नाल्यात हजारो मृत मासे आढळले.
वारंवार होत असलेल्या या घटनांनंतर महाड प्रदूषण नियंत्रण मंडळ केवळ नोटिसा बजावण्याचे काम करत आहे. नुकत्याच झालेल्या या घटनेनंतर पुन्हा एकदा नोटिसा देऊन हे प्रकरण थांबते की ठोस कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्राप्त माहितीनुसार तीन कंपन्याना प्रस्तावित नोटीस बजावली असून, सुनावणीदरम्यान त्यांना त्यांचे मत मांडता येणार आहे. या दरम्यान दोषी आढळल्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार कारवाई केली जाईल.
- प्रकाश ताटे, क्षेत्र अधिकारी