प्लॅस्टिक बंदी झुगारणाऱ्या आस्थापनांना नोटिसा; पनवेल पालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 12:14 AM2020-10-16T00:14:13+5:302020-10-16T00:14:42+5:30
पाच दिवसांत अंमलबजावणी करा
पनवेल : प्लॅस्टिक आणि थर्माकॉल अशा अविघटनशील वस्तूंचा वापर, विक्री, वाहतूक, साठवणूक तसेच हाताळणीस महाराष्ट्र शासनाने बंदी घातली आहे. मात्र, अद्यापही महानगरपालिका क्षेत्रात प्लॅस्टिक वापरावर निर्बंध आले नसल्याने पनवेल महानगरपालिकेने ९ ऑक्टोबर रोजी आदेश काढून प्लॅस्टिक बंदीचा नियम पाळण्याच्या सूचना व्यापारी तसेच दुकानदारांना केल्या आहेत.
पनवेल महानगरपालिकेचे सहायक आयुक्त धैर्यशील जाधव यांनी ही नोटीस बजावली असून नोटीस मिळाल्यापासून पाच दिवसांमध्ये निर्णयाची अंमलबजावणी करताना संबंधितांवर कारवाई करण्यात येतील, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिकेने मोठ्या संख्येने प्लॅस्टिक गोळा केले आहे. प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या आस्थापनांना दंड ठोठावला असताना पनवेल महानगरपालिकेला अद्यापही पूर्णपणे प्लॅस्टिकवर निर्बंध घालता आले नाहीत. पालिकेने नव्याने काढलेल्या आदेशामुळे पनवेल महानगरपालिका विविध आस्थापनांसमोर हतबल झाल्याचे दिसून येत आहे. खुद्द पालिकेनेच या पत्रात स्पष्ट केले आहे की अद्यापही दुकानदार, शोरूम, बाजार समित्या, मॉल्स, व्यापारी संस्था, खाजगी कार्यालये, दवाखाने, गॅरेज, भोजनालयांमार्फत प्लॅस्टिकचा वापर सुरू आहे. पालिकेने बजावलेल्या नोटीसमध्ये या आस्थापनांना घनकचरा वर्गीकरणासाठी दुकानासमोर तीन डबे व्यावसायिक मालमत्तेसमोर ठेवण्याचे सूचित करण्यात आले आहे. उघड्यावर कचरा टाकणे, थुंकणे आदींबाबत पालिकेने या नोटिसीद्वारे नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.
वापर सुरूच
राज्यात प्लॅस्टिकवर बंदी घालणारी पनवेल महानगरपालिका राज्यातील पहिली महानगरपालिका असली तरी अद्यापही पालिका क्षेत्रात सर्रास प्लॅस्टिकचा वापर सुरू आहे. पालिकेमार्फत नियुक्त केलेल्या प्रभाग अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने या प्लॅस्टिकचा सर्रास वापर सुरू असल्याची चर्चा आहे.