मोहोपाडा : उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र.१ कर्जत यांच्या कार्यालयाकडून चौक गावातील कोल्हापूर-तारापूर ते तीनघरपर्यंत बाजारपेठेमधील रस्त्यालगत असणाऱ्या घरमालकांना अनधिकृत बांधकाम म्हणून नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. ही बांधकामे स्वत: न काढल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग काढेल व झालेला खर्च घरमालक यांच्याकडून वसूल करेल, असे स्पष्ट केले आहे. तर ज्या गावात शिवप्रभूंचे विश्वासू सरनौबत नेताजी पालकर यांचा जन्म झाला, ज्या गावात ब्रिटिश सरकारने पूल बांधला, ज्या गावातून राष्ट्रीय महामार्ग क्र.४ जातो, ज्या गावात स्वातंत्र्यसैनिक यांचा जन्म झाला, त्या गावातील सर्वच घरे अनधिकृत बांधकामे यात मोडतात का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हा रस्ता म्हणजे जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.४ होय. या गावात १०० वर्षे जुनी घरे आहेत. ग्रुप ग्रामपंचायत चौकची स्थापना १ जून १९५१ रोजी झाली आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायती व चौक ग्रामपंचायत अस्तित्वात येण्यापूर्वीची बांधकामे आहेत. ही बांधकामे अधिकृत की अनधिकृत? हे ठरविण्याचा अधिकार बांधकाम विभागाला कुणी दिला. जी बांधकामे रस्त्याच्या गटारावर आहेत, जुन्या राष्ट्रीय महामार्गाला अडथळा येत आहेत, यांच्यावर कारवाई न करता सरसकट नोटीस देणे चुकीचे असल्याचे येथील ज्येष्ठ ग्रामस्थ व व्यापारी यांचे मत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, नगररचना या संस्थेच्या निर्मितीअगोदर ज्यांची घरे आहेत, त्यांनी ना हरकत दाखले कुठून उपलब्ध करायचे? असा प्रश्न उपस्थित होतो. चौक हे ऐतिहासिक गाव असल्याने बाजारपेठेतील रस्त्यालगत राम मंदिर, मारुती मंदिर, देवी मंदिर व दर्गादेखील आहे. त्यामुळे येथे तेढ निर्माण न होता सामंजस्यपणे विचारविनिमय होणे गरजेचे आहे, असाही मतप्रवाह आहे.येथील ग्रामस्थांचा विकासाला विरोध नाही. मात्र, विकासाच्या आड कुणाच्या अर्थपूर्ण हिताचे काम होत असेल तर त्याला विरोध नक्कीच होईल. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुतर्फा सात मीटरची मर्यादा दिली आहे, तिचे पालन झाले तर एकही इमारत तुटल्याशिवाय राहणार नाही. याबाबत माजी आमदार देवेंद्र साटम यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही. या ठिकाणी वाहतूककोंडी, अपघात होऊ नये यासाठीच नोटीस बजावली असल्याचे सांगून भविष्यात बांधकाम विभागावर ठपका येऊ नये, हा प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे अभियंता सर्वगौड यांनी सांगितले.च्हा रस्ता म्हणजे जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.४ होय. या गावात १०० वर्षे जुनी घरे आहेत. ग्रुप ग्रामपंचायत चौकची स्थापना १ जून १९५१ रोजी झाली आहे.